जुन्या आणि नव्या पिढीला सांधणारा मार्गदर्शक गमावला; मुख्यमंत्री ठाकरेंची रायकर यांना श्रद्धांजली

By ऑनलाइन लोकमत | Published: January 22, 2022 10:55 AM2022-01-22T10:55:03+5:302022-01-22T10:55:25+5:30

दिनकर रायकर यांच्या निधनाचे वृत्त येताच, लोकमत परिवारासह पत्रकारिता आणि राजकीय क्षेत्रातील मान्यवरांनी त्यांच्या कार्याचा गौरव करत श्रद्धांजली वाहिली.

governor koshyari cm uddhav thackeray mourn senior journalist dinkar raikars death | जुन्या आणि नव्या पिढीला सांधणारा मार्गदर्शक गमावला; मुख्यमंत्री ठाकरेंची रायकर यांना श्रद्धांजली

जुन्या आणि नव्या पिढीला सांधणारा मार्गदर्शक गमावला; मुख्यमंत्री ठाकरेंची रायकर यांना श्रद्धांजली

googlenewsNext

मुंबई : पत्रकारितेच्या क्षेत्रात मूल्यांचे जतन व्हावे आणि आधुनिक प्रवाह रूजावेत यासाठी योगदान देणारा संपादक गमावला. इंग्रजी, मराठी पत्रकारितेच्या क्षेत्रात काम करताना त्यांनी जुन्या आणि नव्या पिढ्यांना सांधणारी मार्गदर्शकाची भूमिका उत्तमरीत्या बजावली, अशा शब्दांत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिनकर रायकर यांचा गौरव केला.

दिनकर रायकर यांच्या निधनाचे वृत्त येताच, लोकमत परिवारासह पत्रकारिता आणि राजकीय क्षेत्रातील मान्यवरांनी त्यांच्या कार्याचा गौरव करत श्रद्धांजली वाहिली. रायकर यांच्यासमवेत पत्रकारितेत काम केलेल्या अनेक ज्येष्ठ पत्रकारांनी त्यांच्याबद्दलच्या आठवणींना उजाळा दिला. हसतमुख आणि दिलखुलास व्यक्तिमत्त्व म्हणून ते सदोदित आठवणीत राहतील, अशा शब्दांत मान्यवरांनी आदरांजली वाहिली.

सगळ्यात तरुण सहकारी
दिनकर रायकर आणि माझी जुनी मैत्री. नंतर इतकी वर्षे त्यांनी सोबत काम केले. ते माझे वयाने सर्वांत ज्येष्ठ आणि वृत्तीने सगळ्यात तरुण सहकारी होते. त्यांचा वियोग मला आणि आपल्या लोकमत कुटुंबाला न पेलवणारा आहे.
- विजय दर्डा, लोकमत एडिटोरिअल बोर्डाचे चेअरमन आणि माजी खासदार.

अखेरच्या श्वासापर्यंत कार्यरत
ज्येष्ठ पत्रकार, लोकमतचे माजी समूह संपादक दिनकर रायकर यांचे जाणे वेदना देणारे आहे. प्रथम औरंगाबाद, नंतर मुंबई येथे लोकमतची धुरा त्यांनी सांभाळली. अनेक पत्रकार घडविले. हसतमुख, दिलदार आणि विद्वान सहकाऱ्याला मी मुकलो आहे. अखेरच्या श्वासापर्यंत ते कार्यरत होते. भावपूर्ण श्रद्धांजली.
- राजेंद्र दर्डा, लोकमतचे एडिटर इन चीफ

जगन्मित्र रायकर
ज्येष्ठ पत्रकार, साक्षेपी संपादक दिनकर रायकर यांचे निधन दु:खदायक आहे. जगन्मित्र अशी ओळख असलेले रायकर पत्रकारितेत शब्दांची जुळवणूक करताना माणसंही जोडत गेले ! त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली!
- शरद पवार, अध्यक्ष, राष्ट्रवादी काँग्रेस

साक्षेपी आणि संयत पत्रकार, संपादक
रायकर हे अभ्यासू, साक्षेपी व संयत पत्रकार व संपादक होते. पत्रकारितेच्या प्रदीर्घ वाटचालीत अनेक वृत्तपत्रांमध्ये काम करताना त्यांनी वेगळा ठसा उमटवला. संपादक म्हणून वाचकांचे प्रबोधन करताना त्यांनी टोकाच्या भूमिका घेतल्या नाहीत. राज्यातील अनेक पत्रकारांच्या जडणघडणीत त्यांचे योगदान अत्यंत मोलाचे होते. महाराष्ट्राच्या माध्यम जगतातील एका व्यासंगी पत्रकार-संपादकाला तसेच समाजाशी बांधीलकी जपणाऱ्या व्यक्तीला आपण मुकलो आहोत.
- भगतसिंह कोश्यारी, राज्यपाल

अभ्यासक हरपला
महाराष्ट्राच्या राजकीय, सामाजिक, सांस्कृतिक चळवळींचा अभ्यासक, राज्याच्या वाटचालीतील अर्धशतकाचा महत्त्वाचा साक्षीदार हरपला आहे. रायकर यांची पत्रकारिता राज्यकर्त्यांसाठी मार्गदर्शक, जनसामान्यांना न्याय मिळवून देणारी होती. पत्रकारितेतील अर्धशतकाच्या वाटचालीत त्यांनी राज्यातील अनेक सामाजिक प्रश्नांना वाचा फोडली. राज्याच्या विकासप्रक्रियेत महत्त्वाचे योगदान दिले.
- अजित पवार, उपमुख्यमंत्री.

राजकारण, समाजकारणाचा अनुभव
‘लोकमत’चे माजी समूह संपादक दिनकर रायकर यांच्या निधनाने राजकारण-समाजकारणाचा दांडगा अभ्यास असलेल्या ज्येष्ठ व्यक्तिमत्त्वाला आपण मुकलो आहोत. पाच दशकांहून अधिक काळ ते पत्रकारितेत होते. पत्रकारांच्या समस्या सोडविण्यात त्यांची भूमिका मोलाची असे. त्यांना विनम्र श्रद्धांजली!
- देवेंद्र फडणवीस, विरोधी पक्षनेते.

Web Title: governor koshyari cm uddhav thackeray mourn senior journalist dinkar raikars death

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.