लॉकडाउनमध्ये राज्यपाल शिकताहेत मराठी; पाच दिवशी शिकवणी

By ऑनलाइन लोकमत | Published: May 29, 2020 12:40 AM2020-05-29T00:40:28+5:302020-05-29T00:40:37+5:30

थोडे- थोडे मराठी बोलण्याचा प्रयत्न, समर्थ रामदास स्वामींच्या दासबोधावर विशेष श्रद्धा

 Governor learning Marathi in lockdown; Teaching in five days | लॉकडाउनमध्ये राज्यपाल शिकताहेत मराठी; पाच दिवशी शिकवणी

लॉकडाउनमध्ये राज्यपाल शिकताहेत मराठी; पाच दिवशी शिकवणी

Next

- यदु जोशी

मुंबई : राज्यपाल भगतसिंह कोश्यारी सध्या मराठी शिकत आहेत. त्यासाठी त्यांनी शिकवणी लावली आहे. आठवड्यातून पाच दिवस ते एक तास शिकवणीला बसतात; अगदी विद्यार्थ्यासारखे.

कोश्यारी हे मूळचे उत्तराखंडचे. तेथे त्यांना प्रेमादराने भगतदा म्हणतात. महाराष्ट्रात पाय ठेवल्यापासूनच त्यांचे मराठीविषयीचे प्रेम दिसून आले. राज्यपालपदाची शपथ त्यांनी मराठीतून घेतली होती. विधिमंडळाच्या संयुक्त सभागृहासमोर त्यांनी मराठीतूनच अभिभाषणे दिली. आता मराठी उत्तम प्रकारे लिहिता, वाचता आली पाहिजे असा ध्यास ७८ वर्षीय कोश्यारी यांनी घेतला आहे. त्यांच्या मराठीच्या शिक्षिका आहेत, उत्कर्षा मुणगेकर. त्या ठाणे येथील मो. ह. विद्यालयात संस्कृत व मराठीच्या शिक्षिका आहेत.

राज्यपालांचे खासगी सचिव उल्हास मुणगेकर यांच्या त्या पत्नी. उत्कर्षा यांच्याकडून ते मराठीचे धडे गिरवत आहेत. आजकाल ते थोडे थोडे मराठी बोलण्याचा प्रयत्न करतात. राजभवनातील सेवकवर्ग, कर्मचारी यांच्याशी ते कधीकधी मराठीतून संवाद साधतात. समर्थ रामदास स्वामी लिखित दासबोधावर राज्यपालांची विशेष श्रद्धा आहे. जीवनाच्या विविध अंगांचे मर्म दासबोधात असल्याचे त्यांचे मत आहे.

दासबोधाची इंग्रजी व हिंदी आवृत्ती त्यांच्याकडे आहे व त्याचे वाचन ते नियमितपणे करतात. राज्यपाल म्हणून त्यांना काहीच दिवस झाले, तेव्हा त्यांनी रामदासस्वामी यांच्या आनंदवनभूवनी या रचनेची सीडी मागवून घेत त्यांच्या कार्यालयाचे जनसंपर्क अधिकारी उमेश काशीकर यांना सुखद धक्का दिला होता.

मराठी ही अतिशय समृद्ध वारसा लाभलेली व अभिजात सौंदर्य असलेली संपन्न अशी भाषा आहे. संत ज्ञानोबा- तुकोबांची, समर्थ रामदासांची, ज्येष्ठ व श्रेष्ठ समाजसुधारकांची ही भाषा. तिचा एक पायिक होण्याचा माझा अल्पसा प्रयत्न आहे.
- भगतसिंह कोश्यारी, राज्यपाल

1. अलीकडे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे विधान परिषदेवर बिनविरोध निवडून आल्यानंतर सहकुटुंब राजभवनवर गेले होते. त्यावेळी त्यांचे स्वागत करताना राज्यपाल मराठीत म्हणाले, वा वा! आपण निर्विरोध विजयी झाल्याबद्दल आपले हार्दिक अभिनंदन!

2.परवा केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांचा वाढदिवस होता. राज्यपालांनी त्यांना फोन केला आणि म्हणाले, वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा. आपल्याला उदंड आयुष्य मिळो. गेल्या महिन्यात माजी केंद्रीय मंत्री राम नाईक यांचेदेखील त्यांनी मराठीतूनच अभीष्टचिंतन केले.

राज्यपालांचे प्रशासनालाखर्चकपातीचे निर्देश

कोरोना संकटाचा मुकाबला करण्यासाठी शासनाकडे अधिक संसाधन उपलब्ध व्हावे या दृष्टीने राज्यपाल भगतसिंह कोश्यारी राजभवनाच्या चालू आर्थिक वर्षाच्या खर्चात विविध उपाययोजनांद्वारे कपात करण्याच्या सूचना राजभवन प्रशासनाला दिल्या आहेत.
राजभवनात कोणतेही नवे मोठे बांधकाम सुरु करण्यात येऊ नये. देशविदेशातील पाहुण्यांना स्वागताच्या वेळी भेटवस्तू वा स्मृतीचिन्ह देऊ नये. पुढील आदेशापर्यंत राजभवन येथे कोणतीही नवी नोकरभरती करू नये, असे राज्यपालांनी सांगितले आहे. स्वातंत्र्यदिनाच्या संध्येला १५ ऑगस्ट रोजी पुणे येथील राजभवन येथे राज्यपाल आयोजित करीत असलेला स्वागत समारंभ यंदा रद्द करण्यात येणार आहे.

Web Title:  Governor learning Marathi in lockdown; Teaching in five days

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.