देशातील संत भारताला पुन्हा एकदा विश्वगुरू करतील; राज्यपालांना विश्वास
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 19, 2022 04:13 PM2022-12-19T16:13:39+5:302022-12-19T16:15:06+5:30
'हिंदुत्वाचे आधारस्तंभ' पुरस्कारांचे वितरण
मुंबई: 'हिंदु एज्युकेशन अँड रिसर्च फाउंडेशन'द्वारे आयोजित 'हिंदुत्त्व के आधारस्तंभ' हे संमेलन आणि पुरस्कार यशवंतराव चव्हाण सभागृह येथे शनिवार, १० डिसेंबर रोजी पार पडले. सकाळी पार पडलेल्या संमेलनामध्ये अनेक मान्यवरांनी आपले विचार मांडले. विविध क्षेत्रात महत्त्वाचे कार्य करणार्या व्यक्तिमत्त्वांचा 'हिंदुत्त्व के आधारस्तंभ' या पुरस्काराने सन्मान करण्यात आला. हा कार्यक्रम महाराष्ट्राचे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडला. कार्यक्रमासाठी देशभरातील विविध क्षेत्रातील मान्यवरांनी उपस्थिती लावली होती.
'हिंदू एज्युकेशन ॲड रिसर्च फाऊंडेशन'च्या संचालिका आणि वरिष्ठ पत्रकार डॉ. वैदेही ताम्हण यांच्या पुढाकाराने हा कार्यक्रम पार पडला. यावेळी डॉ. वैदेही ताम्हण यांनी लिहिलेल्या 'लाईफ बियाँड कॉम्प्लिकेशन्स' या सद्गुरु श्री रितेश्वर महाराज यांच्या जीवनचरित्राचे राज्यपालांच्या हस्ते अनावरण करण्यात आले. हिंदुत्वाचे आधारस्तंभ पुरस्काराने हिंदुत्वासाठी कार्य करीत असलेल्या संतांचा सन्मान करण्यात आला. यात सद्गुरू नारायण महाराज, गहिनीनाथ महाराज औसेकर, त्रिगुण महाराज गोसावी, महंत सीतारामदास निर्मोही यांना गौरविण्यात आले.
सायंकाळी सुरू झालेल्या पुरस्कार वितरण सोहळ्यात मान्यवरांना पुरस्कार देऊन गौरविण्यात आले. यात सुब्रमणियन स्वामी यांना आचार्य भारद्वाज पुरस्कार, स्वप्नील जोशी, शरद पोंक्षे यांना कवी कुलगुरू कालिदास पुरस्कार, अनुराधा पौडवाल यांना आचार्य सुरदास पुरस्कार, सुरेश चव्हाणके यांना आचार्य नारद पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले.
यावेळी राज्यपाल भगतसिंग कोश्यारी म्हणाले, "भारत पूर्वीपासून आध्यात्मिक देश आहे. आत्मप्राप्ती करणे हे मनुष्यजीवनाचे सार्थक आहे, ही येथील संतांची शिकवण आहे. स्वामी विवेकानंद यांना रामकृष्ण परमहंस यांनी साक्षात् परमात्म्याचे दर्शन घडवले. त्याप्रमाणे देशातील संत हे समाज आणि देश यांना दिशा दाखवून भारताला पुन्हा एकदा विश्वगुरु करतील."
आफ्टरनून व्हॉइस वृत्तपत्राच्या संपादिका वैदेही ताम्हण म्हणाल्या, "हिंदुत्वाचे आधारस्तंभ घराघरात पोहोचवण्याचा माझा प्रयत्न चालू राहील. आपण हिंदुस्थानात राहतो आणि आपला धर्म आपण जपायला हवा आणि जे लोक धर्मासाठी कार्य कारात आहेत त्यांना पुरस्कृत करणे हे आपले कार्तव्य आहे. म्हणूनच, मी 'हिंदू एज्युकेशन अँड रिसर्च फाउंडेशन' ची स्थापना केली. ज्यामधून हिंदू पुराण, मंत्र,आणि वेदांवर पाठ्यक्रम निर्माण केला. त्याचप्रमाणे, हिंदुत्वासाठी कार्य करणाऱ्या लोकांना दरवर्षी पुरस्कृत करण्याचे ठरवले आहे. लोकांनी ह्या संकल्पनेला जास्तीत जास्त साथ दयावी ही माझी इच्छा आहे."
'हिंदू एज्युकेशन ॲड रिसर्च फाऊंडेशन'चे संस्थापक सद्गुरू श्री रितेश्वर महाराज म्हणाले, "ही संकल्पना घेऊन जेव्हा डॉ. वैदेही माझ्याकडे आल्या, तेव्हा मला असं वाटलं की मी हा कार्यक्रम करून घेतला पाहिजे आणि या कार्यक्रमात उचित योगदान देऊन ह्या संकल्पनेला घराघरात पोहचवले पाहिजे. डॉ. वैदेही आणि माझ्या या उपक्रमाला सर्वांनी साथ द्यावी ही माझी इच्छा आहे."
सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"