लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : महाराष्ट्रातील अनुसूचित जाती जमाती आणि मागासवर्गीयांना पदोन्नतीमध्ये आरक्षण देण्याचा अधिकार सर्वोच्च न्यायालयाने राज्य सरकारला दिला आहे. पण, राज्य सरकारने तमाम मागासवर्गीयांचे पदोन्नतीमधील आरक्षण रद्द करून अन्याय केला आहे. या प्रकरणी राज्यपालांनी लक्ष घालून मागासवर्गीयांना पदोन्नतीमधील आरक्षणाचा अधिकार मिळवून द्यावा, अशी मागणी रिपाइंचे अध्यक्ष आणि केंद्रीय सामाजिक न्याय राज्य मंत्री रामदास आठवले राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्याकडे केली.
रामदास आठवले यांच्या नेतृत्वातील रिपाइंच्या शिष्टमंडळाने आज राजभवन येथे राज्यपाल कोश्यारी यांची भेट घेतली. यावेळी पदोन्नतीमधील आरक्षणासाठी राज्यपालांनी लक्ष घालावे, अशी मागणी करण्यात आली. तसेच, महाराष्ट्रात मराठा आणि संपूर्ण देशात क्षत्रिय समाजातील राजपूत, ठाकूर आदी जातींना आर्थिक निकषावर स्वतंत्र आरक्षण देण्यासाठी राष्ट्रपती आणि पंतप्रधान यांनी हस्तक्षेप करावा, अशी मागणीही करण्यात आली. यावेळी आठवले यांच्यासह अविनाश महातेकर, सुमंत गायकवा, काकासाहेब खंबाळकर आदी उपस्थित होते.
...................................