मुंबई विद्यापीठाच्या निकालासंदर्भात राज्यपालांनी घेतला आढावा
By ऑनलाइन लोकमत | Published: August 18, 2017 06:42 PM2017-08-18T18:42:14+5:302017-08-18T19:16:04+5:30
मुंबई विद्यापीठाच्या निकालासंदर्भात विद्यापीठाचे प्रभारी कुलगुरु देवानंद शिंदे यांनी आज राज्यपालांकडे सादरीकरण केले. निकालाची सद्यस्थितीची माहिती कुलगुरुंनी राज्यपालांना दिली.
मुंबई, दि - 18 - मुंबई विद्यापीठाच्या निकालासंदर्भात विद्यापीठाचे प्रभारी कुलगुरु देवानंद शिंदे यांनी आज राज्यपालांकडे सादरीकरण केले. निकालाची सद्यस्थितीची माहिती कुलगुरुंनी राज्यपालांना दिली. उत्तरपत्रिका तपासण्याबाबत उद्भवलेल्या अडचणी संदर्भात आणि या अडचणींचे कोणत्या पध्दतीने निराकारण करण्यात आले, याची माहितीही राज्यपालांना देण्यात आली असून कोणत्याही विद्यार्थ्याचे शैक्षणिक नुकसान होणार नाही याची दक्षता घेण्यात येईल, असे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री विनोद तावडे यांनी आज पत्रकार परिषदेत सांगितले.
राजभवन येथे राज्यपालांसमवेत झालेल्या बैठकीची माहिती तावडे यांनी आज मंत्रालयात एका पत्रकार परिषदेत दिली. तावडे यांनी सांगितले की, मुंबई विद्यापीठाच्या निकालासंदर्भात राज्यपाल सी. विद्यासागर राव यांनी आज राजभवन येथे आढावा बैठक निमंत्रित केली होती. या बैठकीला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उच्च व तंत्रशिक्षण मंत्री विनोद तावडे, राज्यमंत्री रविंद्र वायकर, मुंबई विद्यापीठाचे प्रभारी कुलगुरु देवानंद शिंदे, विभागाचे सचिव, प्रभारी परीक्षा नियंत्रक आदी संबंधित अधिकारी उपस्थित होते.
विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होऊ नये या दृष्टीने काही निर्णय घेण्यात आले असून यासंदर्भात माहिती देताना विनोद तावडे म्हणाले की, कॅट परीक्षेमार्फत देण्यात येणारे प्रवेश हे कॅटच्या निकालामार्फत दिले जातील. पदवी परीक्षेच्या प्रवेशासाठी विद्यार्थ्यांचा प्रवेश थांबविला जाणार नाही. एखाद्या विद्यार्थ्याचा निकाल उशिरा लागला पण तो विद्यार्थी जर मेरिट मध्ये असेल तर त्याला प्रवेश दिला जाईल. ज्या उत्तरपत्रिका तपासून झाल्या आहेत तेवढेच निकाल जाहीर करता येतील का याबाबत परीक्षा मंडळाला सुचविण्यात येईल. बहुतांश परीक्षांचे ९६ टक्के मूल्यांकन पूर्ण झाले असून ४ टक्के मूल्यांकन शिल्लक असल्याचेही विनोद तावडे यांनी सांगितले.
पूनर्रमूल्यांकनासाठी पर्यायी व्यवस्था सुरु करण्यात येणार असून त्यासाठी वेगळी रचना तयार करण्यात येईल. विद्यार्थ्यांचे निकाल वेळेत लागतील याला प्राधान्य देण्यात येईल, असे सांगतानाच विनोद तावडे म्हणाले की पूनर्रमूल्यांकनाचे शुल्क सध्या ५० टक्के कमी करण्यात आले आहे.
७१४ शाळांचे मुंबई बँकेत खाते...
शिक्षकांचे वेतन कोणत्या बँकेतून होणार यासंदर्भात काही शिक्षक संघटना चुकीची माहिती सोशल मीडियातून पसरवित आहे. त्यामुळे शिक्षकांची दिशाभूल करण्याचा प्रयत्न केला जात आहे, असे सांगताना विनोद तावडे म्हणाले की, एकुण ९५६ शाळांपैकी ७१४ मुख्याध्यापकांचे मुंबई बँक मध्ये खाते उघडले आहे. उर्वरीत २०४ मुख्याध्यापंकाना मुंबई अथवा युनियन बँक ऑफ इंडिया असा पर्याय यासंदर्भात उच्च न्यालयात सुरु असलेल्या सुनावणीच्या पुढील तारखेपर्यंत देण्यात आलेला आहे. एकुण २१,७८० शिक्षक असून यापैकी १९,६६९ शिक्षकांनी मुंबई बॅकेत खाते उघडले आहे. आतापर्यंत ११,६६५ शिक्षकांना वेतन अदा करण्यात आले आहे, असेही तावडे यांनी स्पष्ट केले.