ठाणे : गेल्या १४ दिवसांपासून महाराष्ट्रात काळजीवाहू सरकार आहे. नवीन सरकार का स्थापन केले जात नाही, याचे उत्तर शिवसेना आणि भाजपने देणे गरजेचे आहे. राज्यपालांनीही आतापर्यंत कोणालाही सरकार स्थापण्यासाठी निमंत्रण दिले नाही. महाराष्ट्राचे राज्यपाल भाजपच्या दबावाखाली आहेत का, असा परखड सवाल काँग्रेसचे प्रवक्ते सचिन सावंत यांनी गुरुवारी ठाण्यात केला.
भाजपने सत्तेचा गैरवापर केल्यामुळेच काँग्रेसला अनेक ठिकाणी विधानसभा निवडणुकीसाठी प्रचारसभाही घेता आल्या नाही. अनेक ठिकाणी वेगवेगळ्या कारणांनी नेत्यांच्या हेलिकॉप्टरला परवानगीही नाकारण्यात आली. त्यामुळेच काँग्रेसचे नेते ठाण्यातही प्रचारासाठी येऊ शकले नसल्याचा आरोप सावंत यांनी केला. वाढती बेरोजगारी, शेतकऱ्यांवरील अन्याय तसेच कोलमडलेली अर्थव्यवस्था आदींच्या विरुद्ध राज्यासह देशभर काँग्रेसच्या वतीने ५ ते १५ नोव्हेंबरदरम्यान आंदोलने केली जाणार आहेत.
ठाणे जिल्ह्यातही ठिकठिकाणी मोर्चे काढले जाणार आहेत. याचीच माहिती देण्यासाठी सावंत ठाण्यात आले होते. त्यावेळी त्यांनी हे आरोप केले. जनतेने कौल देऊनही सत्ता स्थापन न करून जनादेशाचा आदर राखला गेला नाही. महाराष्टÑाच्या पावनभूमीवर अनैतिकता पसरविण्याचे काम, फोडाफोडीचे, विखारी आणि साम-दाम-दंड-भेदाचे राजकारण करण्याचे काम भाजपने केलेआहे.संपूर्ण विरोधी पक्ष संपुष्टातच यावा, अशा प्रकारची भूमिका या पक्षाची होती. त्यामुळेच भाजपला विरोध असून हे सरकार येऊ नये, हीच काँग्रेसचीही प्राथमिकता आहे. सध्या सुरू असलेल्या सत्तेच्या समीकरणांकडे काँग्रेसचेही लक्ष आहे. युतीला महाजनादेश नसून जनादेश मिळाला आहे. तरीही, ते सरकार स्थापन करीत नसतील, तर हीच ती वेळ आहे का,हे तपासण्याची वेळ सर्वांवर येऊ शकते.‘जर-तर’ला अर्थ नाहीराष्टÑवादीच्या पाठिंब्यावर जर शिवसेनेने सत्ता स्थापण्यासाठी पुढाकार घेतला, तर काँग्रेसची काय भूमिका असेल, या प्रश्नावर ‘जर-तर’ला काहीच अर्थ नाही. इतकेच त्रोटक उत्तर त्यांनी या वेळी दिले.जनतेची सहानुभूती मिळविण्यासाठी मुख्यमंत्री शेतीच्या नुकसानीची पाहणी करण्यासाठी कधी नव्हे ते बाहेर पडले. दहा हजार कोटींची तरतूद शेतकºयांसाठी केल्याची दिशाभूल केली जात असल्याचाही आरोप त्यांनी केला. हे काळजीवाहू सरकार असल्यामुळे त्याला अनेक मर्यादा आहेत. अनेक ठिकाणी दोन दिवसांतच सरकार स्थापन झाले असताना महाराष्टÑातच राज्यपाल कोणालाही सत्ता स्थापन करण्यासाठी पाचारण करीत नाही. हे पहिल्यांदाच घडते आहे. राज्यपालांवर भाजपकडून दबाव टाकण्याचा प्रयत्न होत आहे का, असा सवालही त्यांनी केला. लोकशाही मार्गाने सरकार येऊ नये म्हणूनच राष्टÑपती राजवटीची भाषा केली जात आहे, असाही आरोप त्यांनी केला.