Join us

प्रकल्पग्रस्तांना राज्यपालांचा दिलासा

By admin | Published: April 28, 2015 10:31 PM

वरसई-जावळी पंचक्रोशीतील ९ महसुली गावे व १३ आदिवासी वाड्यांवरील नागरिकांनी काढलेल्या मोर्चा व धरणे आंदोलनाला आज यश आले.

पेण : वरसई-जावळी पंचक्रोशीतील ९ महसुली गावे व १३ आदिवासी वाड्यांवरील नागरिकांनी काढलेल्या मोर्चा व धरणे आंदोलनाला आज यश आले. राज्यपाल सी. विद्यासागर राव यांच्या नियोजित कार्यक्रमात आ. धैर्यशील पाटील यांनी उपस्थित राहून व्यासपीठावर तब्बल अर्धा तास राज्यपालांशी बाळगंगाबाधितांबाबत प्रश्न मांडले. राज्यपालांनी आदिवासी भाग व प्रकल्पबाधितांच्या न्याय व हक्कासाठी मुख्यमंत्र्यांशी चर्चा करून प्रश्न तडीस लावण्याचे आश्वासन दिले. बाळगंगा प्रकल्पग्रस्तांचे लेखी निवेदन राज्यपालांच्या हाती पडल्याने बाळगंगा प्रकल्पग्रस्तांच्या भवितव्याबाबत राज्यपालांच्या आदेशानुसार काय निर्णय सरकार घेते याकडे लक्ष लागले आहे. आज सकाळी बाळगंगा प्रकल्पग्रस्तांचा मोर्चा पेण प्रांत अधिकारी कार्यालयावर धडकला. इकडे मोर्चाला सामोरे जाणारे अधिकारी नसल्याने धैर्यशील पाटील व बाळगंगा संघर्ष समितीचे अध्यक्ष अविनाश पाटील हे राज्यपालांच्या कार्यक्रमास्थळी उपस्थित राहिले. १२ वाजता पाटील यांनी बरडावाडी येथे प्रकल्पग्रस्तांच्या व्यथा राज्यपालांसमोर मांडल्या असता राज्यपालांनी प्रकल्पग्रस्तांबाबत आपण मुख्यमंत्र्यांशी चर्चा करून प्रकल्पग्रस्तांच्या शिष्टमंडळाला राजभवनावर भेटीचे आमंत्रण दिले. यामुळे इकडे प्रांत कार्यालयासमोर ठिय्या मारून बसलेल्या आंदोलनकर्त्यांना ही माहिती दिली. (वार्ताहर)