मुंबई : राज्यात अभूतपूर्व राजकीय परिस्थिती निर्माण झाली आहे. आता राज्यपाल काय निर्णय घेतात हे आम्ही पहाणार आहोत. सर्वातमोठ्या पक्षाला त्यांनी सरकार स्थापन करण्यासाठी पाचारण करावे, असे आवाहन काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांनी केले आहे. काँग्रेस पक्ष काय करणार, याची उत्सुकता लागून असतानाच काँग्रेस नेत्यांनी आपली भूमिका स्पष्ट केली. थोरात यांच्यासह अशोक चव्हाण, पृथ्वीराज चव्हाण, विजय वडेट्टीवार, माणिकराव ठाकरे आदी नेत्यांनी खा. शरद पवार यांची भेट घेत राजकीय स्थितीवर चर्चा केली.
या भेटीनंतर माध्यमांशी बोलताना थोरात म्हणाले, काळजीवाहू मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची विधाने पाहिली आहेत. आता राज्यपाल कोणते पाऊल उचलतात, याकडे आमचे लक्ष लागून आहे. काँग्रेस पक्ष एकसंघ असून कोणी कितीही प्रयत्न केले तरी पक्षाचा एकही आमदार फुटणार नाही, असा विश्वास पृथ्वीराज चव्हाण यांनी व्यक्त केला.