मुंबई : बुद्ध पौर्णिमेनिमित्त राज्यपाल भगतसिंह कोश्यारी आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राज्यातील नागरिकांना शुभेच्छा दिल्या आहेत. भगवान बुद्धांचे अहिंसा, शांती, करुणा व उपेक्षितांची सेवा हे संस्कार भारतीय समाजमनावर शतकानुशतके रुजले आहेत. आज कोरोनामुळे जग आव्हानात्मक परिस्थितीतून जात असताना भगवान बुद्धांची व्यापक समाज हिताची शिकवण विशेष प्रासंगिक असल्याचे राज्यपालांनी आपल्या संदेशात म्हटले आहे.
तर, तथागत गौतम बुद्धांची शांती, प्रज्ञा आणि करुणेचा संदेश आज जगासाठी मार्गदर्शक असल्याचे मुख्यमंत्र्यांनी म्हटले आहे. तथागतांच्या जीवनातूनच आपल्याला आव्हानांवर मात करण्याची दिशा मिळते. त्यांनी दिलेला प्रज्ञा, शील, करुणेचा संदेश आजच्या घडीला अधिक समर्पक आहे. यातच त्यांच्या विचारांची सार्वकालिकता आहे. बुद्धपौर्णिमेनिमित्त तथागत भगवान गौतम बुद्धांना कोटी कोटी प्रणाम आणि या पवित्र पर्वानिमित्त राज्यातील जनतेला हार्दिक शुभेच्छा, असे मुख्यमंत्र्यांनी आपल्या संदेशात म्हटले.