गोविंदांमध्ये उत्साह!
By Admin | Published: December 13, 2014 02:12 AM2014-12-13T02:12:13+5:302014-12-13T02:12:13+5:30
दहीहंडीला खेळाचा दर्जा मिळावा, यासाठी गेल्या 7 ते 8 वर्षापासून दहीहंडी पथके मागणी करत होती.
मुंबई : दहीहंडीला खेळाचा दर्जा मिळावा, यासाठी गेल्या 7 ते 8 वर्षापासून दहीहंडी पथके मागणी करत होती. थर लावताना जखमी होणारे गोविंदा, थरावरून पडल्यामुळे गोविंदांचे होणारे मृत्यू, बालगोविंदांना होणा:या इजा अशा सर्वच कारणांमुळे दरवर्षी गोविंदा पथकांना टीकेला सामोरे जावे लागत होते.
यंदा न्यायालयाने घातलेल्या र्निबधांमुळे दहीहंडीचा विषय जास्त तापला होता. पुढच्या वर्षी दहीहंडी उत्सव कसा साजरा होणार या विषयाला पूर्णविराम मिळाला आहे. कारण, राज्य सरकारने दहीहंडी उत्सवाला साहसी क्रीडा प्रकाराचा दर्जा दिलेला आहे. यामुळे दहीहंडी पथकात उत्साहाचे वातावरण आहे.
सर्वाना फायदा
- बाळा पडेलकर, अध्यक्ष, दहीहंडी समन्वय समिती
आजचा दिवस हा आनंदाचा दिवस आहे. दहीहंडीला साहसी क्रीडा प्रकार म्हणून जाहीर करण्यात आला आहे. गेल्या सात ते आठ वर्षापासून आम्ही हीच मागणी करत होतो. पण काही ना काही अडचणी येत होत्या. साहसी क्रीडा प्रकाराचा दर्जा मिळाल्याने त्याचा नक्कीच सर्वाना फायदा होणार आहे. दहीहंडीला थर लावताना आम्ही काळजी घ्यायचो, पद्धतशीरपणा होताच, पण क्रीडा प्रकार झाल्यामुळे त्याची नियमावली तयार होईल, ही महत्त्वाची बाब आहे. यामुळे या खेळातील जोखीम कमी होण्यास मदत होणार आहे. ही नियमावली तयार करताना सर्वाची मते घेतली जाणार आहेत. काही जणांना दहीहंडीवर आक्षेप आहेत, त्यांची मते जाणून घेणार आहोत, यानंतरच सर्वसमावेशक अशी नियमावली तयार करण्यावर आमचा भर असेल.
स्वागतार्ह निर्णय
- प्रशांत रेडीज, प्रवक्ता, महाराष्ट्र राज्य माध्यमिक-उच्च माध्यमिक शाळा संघटना
महाराष्ट्र सरकारने दहीहंडीला साहसी खेळाचा दर्जा दिल्याबद्दल सरकारचे अभिनंदन. सरकारने घेतलेला हा निर्णय स्वागतार्ह आहे. विद्याथ्र्याच्या हिताच्या दृष्टीने चांगला निर्णय आहे. आता पुढच्या वर्षी शाळांमध्ये धुमधडाक्यात हंडी फुटणार. न्यायालयात जाण्याची तयारी वाया गेली. आमची सततची मागणी नव्या सरकारने मान्य केली, याचा आनंद आहे. लहान मुलांना दहीहंडी उत्सव आवडतो, पण र्निबधामुळे त्यांना सहभागी होता येईल की नाही, ही भीती होती. आता असे होणार नाही.
र्निबध काढा..
- आरती बारी, संचालिका, स्वस्तिक महिला गोविंदा पथक
दहीहंडीला साहसी खेळाचा दर्जा दिला गेला ही आनंदाची बाब नक्कीच आहे. खेळ म्हणून घोषित झाल्यावर त्याला नियमावली लागू केली जाईल, हेदेखील चांगले आहे. पण, इतक्याने प्रश्न सुटणार नाही. पथकांच्या प्रश्नांकडेदेखील लक्ष दिले पाहिजे. सर्वात महत्त्वाची बाब म्हणजे न्यायालयाने पथकांवर घातलेले र्निबध काढायला पाहिजेत. जय जवान पथकाने नववा थर रचून विश्वविक्रम केला आहे. यामुळे भारताचे नाव जगभरात पोहोचले आहे. हा विश्वविक्रम म्हणजे एक आव्हान आहे. इतर गोविंदा पथकांनादेखील हे आव्हान पेलण्याची इच्छा आहे. मात्र, न्यायालयाने घातलेल्या र्निबधांमुळे हे प्रत्यक्षात येणो शक्य नाही. यामुळेच खेळाचा दर्जा दिल्यावर हे र्निबध हटवले पाहिजेत.
साहसी खेळासाठी कोणता निकष लावला ?
-ऋषिकेश यादव, एव्हरेस्टवीर
निसर्गाशी माणूस जुळवून घेऊन स्पर्धा करतो अथवा निसर्गाला समजून घेऊन त्याच्यावर मात करतो, अशा प्रकारच्या खेळांना साहसी खेळ असे म्हटले जाते. निसर्ग आणि माणूस यांच्या नात्यातून जे खेळ खेळले जातात, त्याच खेळांना साहसी म्हटले जाते. दहीहंडीला साहसी खेळाचा दर्जा देण्यासाठी त्यांनी कोणते नियम लावले आहेत, याची कल्पना नाही. दहीहंडीचे थर रचताना जोखीम असते. ही जोखीम लक्षात घेऊन त्याला साहसी खेळाचा दर्जा दिला गेला असू शकतो. पण मुळात दहीहंडीचे थर लावताना काही गोष्टींचे पालन केल्यास यातील जोखीम कमी होऊ शकते. वरच्या थरावर चढणा:या गोविंदांना सेफ्टी बेल्ट लावला, हेल्मेट दिले आणि याचबरोबरीने खाली मॅट टाकले तर पडल्यावरही या गोविंदांचे अपघात होण्याचा धोका टळेल. जोखीम हा निकष लावून साहसी खेळ म्हणून घोषित केले असेल, तर अनेक अन्य गोष्टींमध्येही जोखीम आहे, मग तेही आता साहसी खेळ होणार का, हा प्रश्नच आहे.