मुंबई : गेल्या वर्षी दहीहंडी दरम्यान वाहतूक नियम उल्लंघनाच्या करण्यात आलेल्या कारवाईची धास्ती गोविंदा पथकातील गोविंदांनी यंदा घेतल्याचे दिसून आले. त्यामुळे या वेळी तीन विविध कलमांखाली वाहतूक नियम उल्लंघनाच्या करण्यात आलेल्या केसेसची नोंद ही कमी झाली आहे. गुरुवारी दिवसभरात वाहतूक नियम उल्लंघनाच्या ७५२ केसेस दाखल झाल्याचे सांगण्यात आले. दहीहंडीत सहभागी गोविंदांकडून वाहतूक नियमांचे उल्लंघन केले जाते. मागील वर्षीही अशा गोविंदांवर कारवाईचा बडगा उचलण्यात आला होता. मात्र कारवाई करताना विविध तीन गुन्ह्यांवर जास्त लक्ष केंद्रित करण्यात आले होते. यामध्ये ट्रिपल सीट, बेदरकारपणे वाहन चालविणे, ट्रक व टेम्पोवर लटकून प्रवास करणे या गुन्ह्यांचा समावेश होता. यंदा मात्र वाहतूक पोलिसांकडून ट्रिपल सीटविरोधात कारवाई सुरू ठेवताना बेदरकारपणे वाहन चालविणे, ट्रकवर लटकून प्रवास करण्याच्या कारवाईला वगळले. त्याऐवजी विनाहेल्मेट व दारू पिऊन वाहन चालविणे या गुन्ह्यांचा समावेश करण्यात आला होता. गुरुवारी करण्यात आलेल्या कारवाईत ७५२ केसेसची नोंद झाल्याचे वाहतूक पोलिसांकडून सांगण्यात आले. यामध्ये सर्वाधिक केस विनाहेल्मेटच्या झाल्या असून ४९७ केसची नोंद झाल्याची माहिती देण्यात आली. त्यापाठोपाठ ट्रिपल सीटच्या २५२ तर दारू पिऊन वाहन चालविण्याच्या तीन केसची नोंद झाली आहे. गेल्या वर्षी ९१६ केसची नोंद होतानाच यामध्ये ट्रिपल सीटच्या ८२० केसची नोंद झाली होती. (प्रतिनिधी)>आयोजकांसह गोविंदा पथकांवर २२ गुन्हेदहीहंडी उत्सवात सर्वोच्च न्यायालयाने घातलेल्या नियम, अटींचे उल्लंघन केल्याप्रकरणी मुंबई पोलिसांनी २२ गुन्हे दाखल केले आहेत. यात सर्वाधिक सात गुन्हे चेंबूरमध्ये दाखल झाले असून ते मनसेच्या कार्यकर्त्यांवर दाखल झाले आहेत. काळाचौकीमध्ये मनसे कार्यकर्त्याविरुद्ध तब्बल चार गुन्हे दाखल आहेत. विशेष बाब म्हणजे मनसेचा बालेकिल्ला असलेल्या दादरमधील शिवाजी पार्क येथे एक गुन्हा दाखल झाला आहे. विशेष म्हणजे दाखल झालेल्या २२ गुन्ह्यांपैकी १२ गुन्हे हे मनसेच्या कार्यकर्त्यांवर दाखल झाले आहेत.काळाचौकी येथील अभ्युदयनगर परिसरात महाराष्ट्र नवनिर्माण सेना विभाग क्रमांक २००च्या मनसे पदाधिकाऱ्यांनी दहीहंडी उत्सवाचे आयोजन केले होते. या ठिकाणी २० फुटांपेक्षा जास्त थर लावण्यात आले. त्यामुळे मनसे आयोजकाविरुद्ध चार गुन्हे दाखल झाले आहेत. यामध्ये चार वेगवेगळ्या गोविंदा पथकांचाही पाहिजे आरोपी म्हणून समावेश आहे. तर मुंबईत दाखल झालेल्या एकूण गुन्ह्यांमध्ये चेंबूरमध्ये सर्वाधिक सात गुन्हे दाखल झाले आहेत. दाखल झालेल्या २२ गुन्ह्यांमध्ये मनसेसह भाजपा, राष्ट्रवादी, काँग्रेस पक्षाचे कार्यकर्ते, आयोजक आणि गोविंदा मंडळांचा समावेश आहे. न्यायालयाच्या आदेशाचे उल्लंघन करत, १८ वर्षांखालील मुलांचा समावेश करून मानवी मनोरे या ठिकाणी रचण्यात आले होते. त्यामुळे पथकांतील सदस्यांच्या जीवितास धोका होईल असे कृत्य केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तसेच अन्य कलमांचा यामध्ये समावेश आहे. या प्रकरणी अद्याप कुणालाही अटक करण्यात आलेली नाही. याचबरोबरच चित्रीकरणात अन्य काही आयोजक दोषी आढळल्यास त्यावर कारवाई करण्यात येणार असल्याची माहिती पोलीस प्रवक्ते अशोक दुधे यांनी दिली आहे.
गोविंदांनी घेतली कारवाईची धास्ती
By admin | Published: August 27, 2016 1:39 AM