ह्दयद्रावक! दहिहंडीच्या थरावरून पडलेल्या गोविंदाचा उपचारादरम्यान मृत्यू
By ऑनलाइन लोकमत | Published: August 22, 2022 11:17 PM2022-08-22T23:17:03+5:302022-08-22T23:35:16+5:30
दहीहंडी आयोजक रियाझ मस्तान शेख यांच्या विरोधात गोविंदांना सुरक्षा उपकरणे न दिल्याबद्दल मुंबईच्या विलेपार्ले पोलिस ठाण्यात शनिवारी संध्याकाळी एक एफआयआर दाखल करण्यात आला होता.
मुंबई - गेल्या २ वर्षाच्या कोविड काळानंतर पहिल्यांदाच दहिहंडी उत्सव मोठ्या जल्लोषात साजरा करण्यात आला. राज्यातील सत्तांतरानंतर शिंदे-फडणवीस सरकारने दहिहंडीवरील निर्बंध उठवले. त्यासोबतच दहिहंडीचा साहसी खेळात समाविष्ट करत गोविंदांना शासकीय नोकरीत ५ टक्के आरक्षण देण्याचीही घोषणा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केली होती. मात्र दहिहंडीच्या याच उत्सवाला गालबोट लागलं आहे.
विलेपार्ले येथील शिवशंभो मंडळाच्या दहिहंडी पथकातील २४ वर्षीय संदेश दळवी या गोविंदाचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. रविवारी संदेशच्या डोक्याला दुखापत झाल्यामुळे नानावटी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. रविवारी त्याच्यावर शस्त्रक्रिया करण्यात आली. परंतु सोमवारी संध्याकाळी डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले अशी माहिती शिवसेनेचे विलेपार्ले विधानसभा समन्वयक नितीन डीचोलकर यांनी फोन करून लोकमतला माहिती दिली.
Maharashtra | A 24-year-old man namely Sandesh Dalvi, who got injured during #DahiHandi in Bamanwada & was admitted to Cooper Hospital on Aug 19th & later to Nanavati Hospital, has been declared dead today at 2100hrs: BMC
— ANI (@ANI) August 22, 2022
याबाबत पोलिसांनी सांगितले की, दहीहंडी आयोजक रियाझ मस्तान शेख यांच्या विरोधात गोविंदांना सुरक्षा उपकरणे न दिल्याबद्दल मुंबईच्या विलेपार्ले पोलिस ठाण्यात शनिवारी संध्याकाळी एक एफआयआर दाखल करण्यात आला होता. गोविंदांना सुरक्षा उपकरणं न दिल्यामुळे दहिहंडीच्या थरावरून विनय शशिकांत रबडे आणि संदेश प्रकाश दळवी हे दोन गोविंदा खाली पडले आणि जबर जखमी झाले होते. त्यात संदेशच्या डोक्याला गंभीर दुखापत झाल्याने त्याला सुरुवातीला कुपर हॉस्पिटलला नेण्यात आले. त्यानंतर तिथून नानावटीत हलवण्यात आले. परंतु सोमवारी संध्याकाळी संदेशची प्राणज्योत मालावली. संदेश हा विलेपार्ले पूर्वेकडील शिवशंभो गोविंदा पथकात सामील होता. हे पथक शुक्रवारी रात्री विलेपार्ले पूर्वेकडील बामनवाडा भागात दहीहंडी फोडण्यासाठी गेले होते. यावेळी दहीहंडीच्या सर्वात वरील सातव्या थरावरून कोसळून संदेश जखमी झाला होता.
विलेपार्लेतील गोविंदाचा उपचारादरम्यान मृत्यू, सातव्या थरावरून खाली पडला होता #DahiHandipic.twitter.com/tN6jdw5el6
— Lokmat (@lokmat) August 22, 2022
यंदा घोषणेचा दहीकाला
इतर खेळांप्रमाणे गोविंदांना देखील शासकीय नोकरीत जो काही शासकीय कोटा आहे, त्याचाही लाभ घेता येईल. याशिवाय, शासनाच्या इतरही सुविधांचाही लाभ गोविंदांना घेता येईल. दुर्दैवाने दहीहंडी दरम्यान गोविंदाचा मृत्यू झाल्यास त्याच्या कुटुंबीयांना १० लाख रुपये शासनाच्या वतीने देण्याचा निर्णय घेतला आहे. जबर जखमी झालेल्या गोविंदांना आर्थिक मदत म्हणून साडे सात लाख रुपये तर हात-पाय फ्रॅक्चर झाल्यास पाच लाख रुपयांची आर्थिक मदत दिली जाणार अशी घोषणा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केली होती.