गोवंडी पालिका शाळेत विद्यार्थ्यांना विषबाधा?
By ऑनलाइन लोकमत | Published: August 11, 2018 06:43 AM2018-08-11T06:43:17+5:302018-08-11T06:43:32+5:30
गोवंडी येथील महापालिकेच्या उर्दू माध्यमाच्या शाळेत शिकणाऱ्या विद्यार्थ्यांना शुक्रवारी सकाळी अचानक मळमळ, उलट्यांचा त्रास होऊ लागला.
मुंबई : गोवंडी येथील महापालिकेच्या उर्दू माध्यमाच्या शाळेत शिकणाऱ्या विद्यार्थ्यांना शुक्रवारी सकाळी अचानक मळमळ, उलट्यांचा त्रास होऊ लागला. दरम्यान, चांदणी शेख (वय १२) या विद्यार्थिनीचा गुरुवारी रात्री मृत्यू झाला. पालिका शाळांमध्ये देण्यात येणाºया फॉलिक अॅसिडच्या गोळ्यांमुळेच हा मृत्यू झाल्याचा आरोप होऊ लागल्याने पालकांनी घाबरून विद्यार्थ्यांना तत्काळ घाटकोपरच्या राजावाडी तसेच शताब्दी रुग्णालयात तपासणीसाठी दाखल केले. मात्र सर्व विद्यार्थी सुखरूप असून नेमकी विषबाधा कशामुळे झाली, याची चौकशी सुरू आहे.
गोवंडीतील संजयनगर परिसरात असलेल्या महापालिकेच्या उर्दू शाळा क्रमांक दोनमध्ये ही घटना घडली. राज्य शासनाच्या उपक्रमानुसार शालेय विद्यार्थ्यांना दर सोमवारी ‘फॉलिक अॅसिड’ या गोळ्या दिल्या जातात. गरीब कुटुंबातील असलेल्या या विद्यार्थ्यांमध्ये कॅल्शियम आणि रक्तवाढीसाठी या (पान ७ वर)(पान १ वरून) गोळ्या देण्यात येतात. मात्र या शाळेच्या काही मुलांना शुक्रवारी छातीत जळजळ होऊन उलट्या होऊ लागल्या, तर काहींना मळमळू लागले. त्यातच सहावीच्या वर्गात शिकणाºया चांदणीचा गुरुवारी रात्री मृत्यू झाल्याची बातमी पसरल्याने एकच खळबळ उडाली. काही पालकांनी आपल्या मुलांना थेट रुग्णालयात दाखल करण्यास सुरुवात केली.
काही मुलांनी मळमळ, अस्वस्थता आणि चक्कर येत असल्याची तक्रार केली. यापैकी १६१ विद्यार्थ्यांना महापालिकेच्या घाटकोपर येथील राजावाडीत तर ३६ विद्यार्थ्यांना शताब्दी रुग्णालयात दाखल करण्यात आले. या विद्यार्थ्यांना देण्यात आलेल्या लोह व फॉलिक अॅसिडच्या गोळ्या, जंतनाशक गोळ्या राष्ट्रीय कार्यक्रमांतर्गत देण्यात येतात. मात्र आतापर्यंत कुठेही विषबाधा झाल्याचा अहवाल नाही, असे पालिका प्रशासनाने स्पष्ट केले आहे.
विद्यार्थ्यांना दर सोमवारी आयर्न आणि फॉलिक अॅसिडची ४५ मिली ग्रॅम वजनाची प्रत्येकी एक गोळी देण्यात येते. तर सहावी ते दहावीपर्यंतच्या विद्यार्थ्यांना प्रत्येकी १०० मिली ग्रॅमची गोळी देण्यात येते.
खिचडीमुळे विषबाधा?
शाळेत विद्यार्थ्यांनी खिचडी खाल्ली होती. निकृष्ट दर्जाच्या खिचडीमुळे विषबाधा होण्याचे अनेक प्रकार घडले आहेत. त्यामुळे हा विषबाधा नेमकी कशामुळे झाली, असा सवाल होत आहे. विद्यार्थ्यांना दिलेले औषध आणि खिचडीचा नमुना तपासण्यात यावा. तसेच या घटनेची उपायुक्तांमार्फत चौकशी करण्यात यावी, अशी मागणी समाजवादीचे गटनेते रईस शेख यांनी केली आहे.
रक्ताची उलटी होऊन मृत्यू
गुरुवारी रात्री तिला रक्ताची उलटी होऊन तिचा मृत्यू झाला. तिचा मृतदेह शुक्रवारी सकाळी राजावाडी रुग्णालयात आणण्यात आला. तिच्या पूर्वीच्या आजारपणाबद्दल माहिती उपलब्ध नाही. तिचा मृतदेह राजावाडी रुग्णालयातील राज्य शासनाच्या अखत्यारीतील शवविच्छेदनगृहात पाठविण्यात आला आहे. संबंधित अहवाल आल्यानंतरच तिच्या मृत्यूमागचे कारण स्पष्ट होणार असल्याचे कार्यकारी आरोग्य अधिकारी डॉ. पद्मजा केसकर यांनी सांगितले.
विषबाधेबाबत संभ्रम
विद्यार्थ्यांना देण्यात येणाºया गोळ्या गेल्या पाच वर्षांपासून देण्यात येत आहेत. राज्य शासनाच्या एका राष्ट्रीय कार्यक्रमांतर्गत या गोळ्यांचे वाटप करण्यात येते. तसेच या औषधांची मुदत जून २०१९ पर्यंत असल्याने विषबाधेचा प्रश्न येत नाही. तरीही त्या तपासणीसाठी पाठविण्यात आल्या आहेत,
असे शिक्षण समितीचे अध्यक्ष
मंगेश सातमकर यांनी
सांगितले.
पालकांची रुग्णालयात धाव
घाबरलेल्या सर्वच पालिका शाळेतील पालक राजावाडी,
शताब्दी रुग्णालयांमध्ये पाल्याला तपासणीसाठी घेऊन गेले. त्यामुळे या रुग्णालयांमध्ये गर्दी होती.
>महापालिकेच्या उर्दू शाळा क्रमांक दोनमधील विषबाधा झालेल्या विद्यार्थ्यांना गोवंडी येथील शताब्दी रूग्णालयात दाखल करण्यात आले.