Join us

गोविंदा पथकांना प्रायोजक मिळेनात

By admin | Published: August 17, 2015 1:15 AM

वादाच्या तिढ्यातून दहीहंडी उत्सवाची सुटका अजूनही झालेली नाही. तर दुसऱ्या बाजूला शहर-उपनगरांतील गोविंदा पथकांनी उत्सवाची जोरदार तयारी सुरू केली आहे

मुंबई : वादाच्या तिढ्यातून दहीहंडी उत्सवाची सुटका अजूनही झालेली नाही. तर दुसऱ्या बाजूला शहर-उपनगरांतील गोविंदा पथकांनी उत्सवाची जोरदार तयारी सुरू केली आहे. त्यासाठी प्रायोजक मिळवण्यासाठी धडपड सुरू केली आहे. परंतु, उत्सव वादात सापडल्याने गोविंदा पथकांना वणवण करावी लागत आहे. माझगाव, उमरखाडी, गिरगाव, लालबाग, दादर इ. परिसरांतील गोविंदा पथके रात्रसराव जोमाने करत आहेत. तरी दहीहंडी उत्सवाला लाभणारे पुरस्कर्ते मात्र यंदा मूग गिळून गप्प बसले आहेत. कोर्टकचेऱ्या, पोलीस यंत्रणेच्या भीतीपोटी गोविंदा पथकांच्या खर्चात खारीचा वाटा उचलणाऱ्यांनीही हात आखडता घेतला आहे. परिणामी, अनेक गोविंदा पथकांचे आर्थिक गणित कोलमडले आहे. उत्सवाचा खर्च कसा भागवायचा, असा हा प्रश्न पथकांना भेडसावतो आहे. नामांकित पथकांनाही प्रायोजक मिळेनासे झाले आहे. शहर-उपनगरात दहीहंडी समन्वय समितीतर्फे आयोजित होणाऱ्या सभांमध्येही प्रायोजकांविषयी गोविंदा पथकांनी जाहीर नाराजी व्यक्त केली आहे. मात्र, त्यास प्रत्युत्तर देत प्रथम उत्सवाचा वाद सोडविण्यासाठी एकत्र येऊ, अशी भूमिका समितीने घेतली आहे.गेल्या काही वर्षांत विक्रमी थर रचण्यासाठी गोविंदांची संख्या वाढत गेली. गोविंदांना टी-शर्ट, त्यांचा नाश्ता, जेवण, बस, ट्रक, टेम्पो असा संपूर्ण दिवसभराचा पथकाचा खर्च लाखांच्या घरात गेला. (प्रतिनिधी)