लोकमत न्यूज नेटवर्कमुंबई : ‘ढाक्कुमाकुम ढाक्कुमाकुम..’ असे म्हणत, थरांवर थर रचणाऱ्या गोविंदा पथकांचा उत्साह गेल्या काही वर्षांपासून मंदावला आहे. दहीहंडी सण न्यायालयात ‘तारीख पे तारीख’चा कित्ता गिरवित असताना, दुसरीकडे यामुळे गोविंदा पथकांमध्ये कमालीचा संभ्रम दिसून येतो आहे. पूर्वी गुरुपौर्णिमेच्या मुहूर्तावर सरावाचा श्रीगणेशा करून, उत्साहाने सराव करणारी गोविंदा पथके यंदा मात्र ‘त्रिशंकू’ अवस्थेत आहेत. परिणामी, गोविंदा पथकांचा सराव मंदावला असून, या पथकांमध्ये उत्साहाचा अभाव दिसून येतो आहे.दहीहंडी उत्सवात मानवी मनोऱ्यांच्या निर्बंधासंबंधातील पुढील सुनावणी १ आॅगस्टला होणार आहे. गोविंदांच्या सुरक्षेसाठी काय ठोस उपाययोजना केलेल्या आहेत, त्याचे लेखी स्पष्टीकरण सर्वोच्च न्यायालयाने राज्य सरकारकडून मागविले आहे. दहीहंडी उत्सवात २० फुटांच्या वरती मनोरा लावता येणार नाही, तसेच १८ वर्षांखालील गोविंदांना मनोऱ्यात सहभाग घेता येणार नाही, असे निर्बंध उच्च न्यायालयाने घातले आहेत. सर्वोच्च न्यायालयाने हे निर्बंध कायम ठेवले असून, यावर फेरविचार करावा, यासाठी राज्य सरकारने सर्वोच्च न्यायालयात फेरविचार याचिका दाखल केली असून, त्यावरील निर्णय प्रलंबित आहे.दरवर्षी गुरुपौर्णिमेच्या मुहूर्तावर गोविंदा पथके सरावाला सुरुवात करतात. किमान दीड तास ही गोविंदा पथके नियमितपणे सराव करतात. या वेळी उत्सवाच्या दिवशी लावण्यात येणाऱ्या थरांची मांडणी, हंडी फोडणाऱ्या एक्क्यांचा सराव केला जातो. शहर-उपनगरातील नामांकित गोविंदा पथकांचा सराव पाहण्यासाठी छोटेखानी पथके आवर्जून हजेरी लावतात. सरावाच्या २-३ आठवड्यांनंतर या पथकांची प्रायोजक शोधण्यासाठी धावाधाव सुरू होते, तसेच नारळीपौर्णिमेच्या दिवशी साजरा करण्यात येणाऱ्या ‘चोरगोंविदा’चे आयोजन करण्यात ही पथके व्यस्त होतात. शिवाय, दुसऱ्या बाजूला गोपाळकालाच्या दिवशीची वाहतूक व्यवस्था, खानपान सोय याचेही नियोजन सुरू होते. यंदा मात्र, हा उत्साह ओसंडला असून, पथकांचा सराव कासवगतीने सुरू आहे.दहीहंडी उत्सव न्यायालयीन कचाट्यात सापडल्याने यातून बड्या आयोजकांनीही माघार घेतली. परिणामी, या दहीहंडी उत्सवाचे ‘ग्लॅमर’ गेल्या काही वर्षात लयाला गेले आहे. या उत्सवावरील बंदी थांबविण्यासाठी राज्यकर्त्यांनीही फारशी ठोस भूमिका घेत नसल्याने, गोविंदा पथकांमध्ये निराशेचे वातावरण आहे. त्यामुळे आता यंदा राज्य सरकार या विषयी ठोस कायदा अस्तित्वात आणणार का? की, या वर्षी दहीहंडीवरील निर्बंधाच्या कात्रीत अडकूनच उत्सव साजरा करावा लागणार, हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे. सराव सुरूगोविंदा पथकांतील सदस्यांमध्ये गैरसमज होते. मात्र, ते दूर करून उत्साहाने सरावाला सुरुवात झाली आहे. आता न्यायालयाच्या निर्णयानंतर किती थर लावायचे? याविषयी निर्णय घेण्यात येईल. मात्र, तोपर्यंत नियमित सराव सुरू राहील.- समीर सावंत, प्रशिक्षक, प्रेमनगर गोविंदा पथक, चुनाभट्टीयंदाही आठ थर लावणारगुरुपौर्णिमेपासून पथकाने नियमितपणे सरावाला सुरुवात केली आहे. दरवर्षीप्रमाणे यंदाही आठ थर लावणार आहोत. न्यायालयाचा निर्णय हा सकारात्मक येईल, अशी खात्री आहे. अन्य गोविंदा पथकांनीही आपल्या क्षमतेप्रमाणे सराव करून सुरक्षित पद्धतीने सराव करावा. - कमलेश भोईर, प्रशिक्षक, यंग उमरखाडी गोविंदा पथक, उमरखाडी,
यंदा संभ्रमाचा गोविंदा!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 25, 2017 1:00 AM