गोविंदांनो, नऊ थर रचा पण...
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 9, 2017 06:55 AM2017-08-09T06:55:06+5:302017-08-09T06:55:06+5:30
न्यायालयाच्या निर्णयामुळे गोविंदा पथकांना दिलासा मिळाला असला तरी प्रत्यक्षात मात्र गोविंदा पथकांचा सराव अद्याप पूर्ण झालेला नाही. गोविंदा पथकांचा सराव सुरू असून, नीटनेटक्या सरावानंतर नऊ थरांचा प्रयत्न करावा अन्यथा नऊ थर लावणे टाळावे.
लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : न्यायालयाच्या निर्णयामुळे गोविंदा पथकांना दिलासा मिळाला असला तरी प्रत्यक्षात मात्र गोविंदा पथकांचा सराव अद्याप पूर्ण झालेला नाही. गोविंदा पथकांचा सराव सुरू असून, नीटनेटक्या सरावानंतर नऊ थरांचा प्रयत्न करावा अन्यथा नऊ थर लावणे टाळावे. विशेषत: उत्सवाचा उत्साह कायम टिकवत पारंपरिक पद्धतीने दहीहंडी साजरी करावी, असे आवाहन गोविंदा पथकांसह आयोजकांकडून गोविंदाना करण्यात येत आहे. विशेष म्हणजे, थरांची स्पर्धा टाळण्यासह स्वत: सुरक्षा घेण्याचे आवाहनही पथकांसह आयोजकांकडून करण्यात येत आहे. परिणामी, गोविंदांना दिलासा मिळाला असतानाच ऐन दहीहंडी दिवशी किती गोविंदा पथकाकडून सुरक्षा बाळगली जाते, याकडे सर्वांचेच लक्ष असून, नऊ थर लागणार का? याचीही उत्सुकता आता वाढली आहे.
सराव शिबिरांमध्ये गोविंदांची संख्या वाढली आहे. मनोरे रचण्यासाठी गोविंदा तयार होऊ लागले आहेत. दरवर्षीप्रमाणे यंदाही गुरुपौर्णिमेपासून सरावाला सुरुवात झाली; परंतु सरावासाठी येणाºया गोविंदांची संख्या कमी होती; परंतु सरावासाठी मिळणारा कालावधी अगदीच कमी शिल्लक आहे. त्यामुळे जर सराव नसेल झाला, तर नऊ थर लावण्याचा प्रयत्न न केलेलाच बरा. लहान-मोठ्या सर्व मंडळांनी सराव आणि व्यायामावर भर देऊन जितके थर सरावाच्या वेळी लागतील तेवढेच थर लावावेत. उत्सवाच्या दिवशी गोविंदांमध्ये उत्साह मोठ्या प्रमाणात वाढलेला असतो. त्यामुळे त्या दिवशी स्पर्धेमुळे दहीहंडी पथके जास्तीत जास्त थर लावण्याचा प्रयत्न करतात. त्यामुळे दुर्घटना होण्याची शक्यता असते.
- अरुण पाटील, प्रशिक्षक,
माझगाव दक्षिण विभाग सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ गोविंदा पथक
न्यायलयाच्या निर्णयामुळे गोविंदांमध्ये आता उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे. सरावासाठी जरी कमी वेळ असला तरी मोठ्या दहीहंडी पथकांमधील गोविंदाचा व्यायाम हा नित्याचा असतो. सरावासाठी जो वेळ मिळाला आहे त्या वेळात जास्तीत जास्त थर कसे लावता येतील, याचा सराव गोविंद करतील. त्यामुळे यंदा काही गोविंदांकडून नऊ थरांची सलामी दिली जाईल.
- बाळा पडेलकर, अध्यक्ष, दहीहंडी समन्वय समिती
१४ वर्षांवरील गोविंदाना दहीहंडी उत्सवात सहभाग घेण्याची परवानगी देण्यात आली याचे समाधान आहे. कारण, लहान मुलांवर बंदी गरजेची होती. त्यामुळे न्यायालयाने दिलेल्या या निर्णयाचे स्वागत आहे. गोविंदांसोबत कोणतीही दुर्घटना होऊ नये, यासाठी हंडीची उंची जास्त नसावी. हंडीसाठी ३० ते ३५ फूट उंचीची मर्यादा शासनाने लावणे गरजेचे आहे.
- बाळा नांदगावकर, मनसे नेते
गोविंदा पथकांनी जास्तीत जास्त थर लावण्याचा प्रयत्न करण्यापेक्षा पारंपरिक पद्धतीने उत्सव साजरा करण्यावर भर द्यावा. यंदा मोठ्या गोविंदा पथकांची संख्या मागील दोन वर्षांप्रमाणे कमीच असेल. पुढील वर्षीपासून जास्त गोविंदा पथके पुढे येतील. त्यामुळे पुढील वर्षी सरावाला वेळ जास्त मिळेल व जास्त थर लावणे गोविंदांसाठी सोपे जाईल.
- सचिन अहिर, मुंबई अध्यक्ष,
राष्टÑवादी काँगे्रस
गोविंदा पथकाचा सराव सुरू आहे. सरावासाठी वेळ कमी आहे. सरावाशिवाय जास्त थर लावणे शक्य नसते. त्यामुळे नऊ थर लावण्यासाठी जास्तीत जास्त सरावा आणि व्यायामाची गरज आहे. जर गोविंदांना जास्त सराव करता आला तरच नऊ थर लावण्याचा प्रयत्न केला जाईल.
- संदीप ढवळे, प्रशिक्षक, जय जवान गोविंदा पथक