मुंबई : गेली १४ दिवस प्रथमेश सावंत सध्या केईएम रुग्णालयात मृत्यूशी झुंज देत आहे. दहीहंडी उत्सवात थर लावत असताना त्याच्या मणक्याला गंभीर दुखापत झाली असून, त्याच्यावर अतिदक्षता विभागात उपचार सुरू आहेत. डॉक्टरांच्या मते प्रथमेशची प्रकृती यापूर्वी होती त्याचप्रमाणे आहे, त्यात फारसा काही बदल झालेला नाही. गेले अनेक दिवस त्याच्या मंडळाच्या गोविंदा पथकातील कार्यकर्ते आळी-पाळीने रात्रंदिवस अतिदक्षता विभागाच्या बाहेर बसून आहेत.
प्रथमेश समर क्रीडा मित्र मंडळचा सदस्य असून तो करी रोड येथील कामगारस्व सदन येथील चाळीत लहानपणापासून राहत आहे. आई-वडिलांच्या निधनानंतर त्याची बहीणसुद्धा वारली. या सगळ्या दुःखद घटनांनंतर तो काका-काकीसोबत येथे राहत त्याने त्याचे शालेय शिक्षण सोशल सर्व्हिस लीगच्या शाळेत पूर्ण केले. त्यानंतर बारावीचे शिक्षण एमडी महाविद्यालयात पूर्ण केल्यानंतर सध्या औद्योगिक प्रशिक्षण घेत आहे. रोज सकाळी घरोघरी वृत्तपत्र वाटण्याचे काम, दुपारी महाविद्यालय आणि संध्याकाळी पिझ्झा डिलिव्हरीचे काम करतो, असा त्याचा दिनक्रम असल्याचे त्याचे मित्र सांगतात.
केईएम रुग्णालयाच्या अधिष्ठाता डॉ. संगीता रावत यांनी ‘लोकमत’शी बोलताना सांगितले, ‘सध्या प्रथमेश अतिदक्षता विभागात असून, त्याची प्रकृती यापूर्वी होती तशीच आहे, त्यात काही फारसा बदल झालेला नाही . आम्ही त्याच्यावर शक्य तेवढे सगळे उपचार करत आहोत. त्याच्या मणक्याला गंभीर दुखापत झाली असून, सर्व संबंधित तज्ज्ञ डॉक्टर त्याच्या प्रकृतींवर लक्ष ठेवून आहेत."