Join us

मागाठाणेत रंगणार गोविंदाचा थरार; मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांची विशेष उपस्थिती

By मनोहर कुंभेजकर | Published: August 17, 2022 8:38 PM

या सोहळ्याला खास राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपस्थित राहणार आहेत.

मुंबई - कोविडनंतर दोन वर्षांनी येत्या शुक्रवार दि,19 रोजी गोकुळाष्टमी निमित्त पश्चिम उपनगरात सर्वात मोठा दहीकाला उत्सव मागाठाणेत साजरा होणार आहे. येथे अनेक सिनेतारकांच्या उपस्थितीत सकाळी १० ते रात्री १० वाजेपर्यंत येथे गोविंदाचा थरार रंगणार आहे. येथे सलामी देणाऱ्या प्रत्येक गोविंदा पथकांना आकर्षक बक्षिसे देण्यात येणार आहेत. या दहीकाला महोत्सवाचे आयोजन मागाठाणे विधानसभा मतदार संघाचे स्थानिक आमदार प्रकाश सुर्वे यांनी केले आहे. 

या सोहळ्याला खास राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपस्थित राहणार आहेत. तर प्रमुख पाहुणे म्हणून खासदार डॉ.श्रीकांत शिंदे, सांगोल्याचे आमदार शहाजीबापू पाटील उपस्थित राहाणार आहेत. हा महोत्सवात मराठी, हिंदी वाद्यवृंद व लावणी कार्यक्रम तसेच या महोत्सवास मराठी, हिंदी सिनेक्षेत्रातील अनेक मान्यवर, अभिनेते व अभिनेत्री आवर्जून हजेरी लावणार आहेत.

महाराष्ट्राच्या मातीत फुललेल्या मराठी संस्कृतीचा सुगंध तरुणाईत दरवळावा व तरूणांना प्रोत्साहित करण्याकरिता शिवसेना व तारामती फाऊंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने दहीकाला महोत्सवाचे आयोजन येथील देवीपाडा मैदान, एक्सप्रेस हायवेच्या बाजूला, बोरिवली (पूर्व) येथे केले आहे.

दहीहंडी फोडणाऱ्या सिनेकलाकरांचा उत्साह वाढवण्यासाठी येथे प्रसिद्ध सिनेतारका शिल्पा शेट्टी, सोनाली राऊत, शेफाली जरिवाला, श्रुती मराठे, सोनाली कुलकर्णी, मानसी नाई, सुकन्या काळण, महेश मांजरेकर आदी मान्यवर खास उपस्थित राहणार असल्याची माहिती आमदार प्रकाश सुर्वे यांनी दिली.

सलामी देणाऱ्या प्रत्येक दहीकाला पथकास ५ थर ३,००० रुपये, ६ थर ५,००० रुपये, ७ थर ७,००० रुपये, ८ थर २५,००० रुपये, ९ थर १०,००० रुपये, विशेष प्रात्यक्षिके व मनोरे सादर करणाऱ्या पथकास १०,००० ते १,००,००० रोख बक्षीस दिले जाणार आहे व महिला गोविंदास थरांची रक्कम, विशेष पारितोषिक व रोख रक्कम देवून गौरवण्यात येणार असून या वर्षीच्या दहीकाला महोत्यवाचे विशेष म्हणजे या दहीकाला महोत्सवातील दहीहंडी फोडणाऱ्या शेवटच्या ऐक्याचा शिक्षणाचा सर्व खर्च उचलणार आहे, अशी माहिती त्यांनी दिली. 

टॅग्स :दहीहंडीदेवेंद्र फडणवीसएकनाथ शिंदे