दहीहंडीदिवशी गोविंदांचे शून्य अपघाताचे ध्येय

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 15, 2017 01:44 AM2017-08-15T01:44:11+5:302017-08-15T01:44:14+5:30

गोविंदा सुरक्षित राहावा यासाठी दहीहंडी समन्वय समितीकडून शक्य ते सर्व प्रयत्न करण्यात येत आहेत.

Govind's accidental accident of Dahihandi | दहीहंडीदिवशी गोविंदांचे शून्य अपघाताचे ध्येय

दहीहंडीदिवशी गोविंदांचे शून्य अपघाताचे ध्येय

Next

गोविंदाच्या सुरक्षेसाठी काय करायला हवे?
गोविंदा सुरक्षित राहावा यासाठी दहीहंडी समन्वय समितीकडून शक्य ते सर्व प्रयत्न करण्यात येत आहेत. परंतु स्वत:च्या सुरक्षेची जबाबदारी गोविंदानीही घेणे गरजेचे आहे. प्रत्येक गोविंदा व आयोजकांनी नियमावलीचे पालन करणे अत्यंत गरजेचे आहे. गोविंदांच्या येण्या-जाण्याचा मार्ग वेगवेगळा असावा. दहीहंडीजवळ डॉक्टरांसह सुसज्ज रुग्णवाहिका ठेवावी. हेल्मेट, चेस्ट गार्ड, पट्टे यांचा वापर करावा. गोविंदांनी ट्रक -बसच्या टपावरून प्रवास करू नये, ट्रिपल सीट प्रवास करू नये.
विमाप्रश्नी तुम्ही काय सांगाल?
मागील वर्षापर्यंत विम्याची रक्कम अडीच लाखांपर्यंत होती; ती रक्कम यंदा दहा लाखापर्यंत वाढविण्यात आली आहे. विमा काढणे अत्यावश्यक आहे. ज्या गोविंदांनी विमा काढला नसेल त्यांनी स्वत:ची जबाबदारी घ्यावी. उत्सवाला गालबोट लागणार नाही याची काळजी घ्यावी.
प्रायोजकत्वाचा मोठा प्रश्न उभा राहिला आहे का?
होय. या वर्षी खूप कमी प्रायोजक पुढे आल्याने गोविंदा पथकांसमोर खर्चाचे गणित कसे सोडवावे, असा प्रश्न उभा आहे. अनेक प्रायोजकांनी त्यांच्या वार्षिक बजेटमध्ये दहीहंडीचा समावेश न केल्याने यंदा खूप कमी प्रायोजक लाभले आहेत. पथकातील सर्व मुलांचे कपडे, प्रवासखर्च, जेवणखर्च, विम्याचा खर्च आणि इतरही खर्च असतात; अशा परिस्थितीत प्रायोजकांनी माघार घेणे अत्यंत दुर्दैवाचे आहे. आर्थिक गणित कोलमडलेले असताना सरावाला कमी वेळ मिळाला असल्याने कदाचित यंदा कमी थर लागतील. परंतु थर हे सुरक्षित लागतील, अशी अपेक्षा आहे. ‘ध्येय अमुचे शून्य अपघाताचे’ हे आमचे यंदाचे उद्दिष्ट आहे.
पुढील वर्षी काय उद्दिष्ट आहेत?
आयोजकांच्या मनात किंतु राहिल्यामुळे यंदा थोडे कमी आयोजक पुढे आले आहेत. पुढील वर्षीचा उत्सव यंदापेक्षा मोठा व्हावा यासाठी दहीहंडी समन्वय समिती पुढील महिन्यापासूनच कामाला लागणार आहे. यंदा उत्सवादरम्यान समितीचे कार्यकर्ते सर्व शहरभर फिरणार असून, सर्व गोविंदा पथकांचे निरीक्षण करून त्यांना प्रमाणपत्र देणार आहेत. त्या प्रमाणपत्रांनुसार त्या पथकांनी किती थर लावावेत, सराव किती करावा, प्रशिक्षण याबाबतचे मार्गदर्शन करणार आहेत. पोलीस मित्रांकडूनही त्याबाबत मागदर्शन घेणार आहोत.
गोविंदा पथक अथवा मंडळांच्या सहकार्याबाबत काय सांगाल?
यंदा समन्वय समितीने शहरातील सर्व दहीहंडी पथकांशी समन्वय साधण्याचा प्रयत्न केला. आम्हाला मोठ्या प्रमाणात यश मिळाले. हे काम आम्ही पुढील वर्षीही करणार आहोत. शहरातील अगदी लहान मंडळापर्यंत पोहोचणार आहोत. लहान मंडळे मोठ्या मंडळांमध्ये विलीन करण्याबाबत पावले उचलणार आहोत. जेणेकरून मोठ्या मंडळांची ताकद वाढेलच, परंतु लहान मंडळांनाही मोठ्या हंड्यांमध्ये सामील होता येईल.
>दहीहंडीच्या उंचीवरील निर्बंध उठवले गेले. गोविंदाची वयोमर्यादा १८वरून १४ करण्यात आली. परंतु उत्सवाला लागलेले ग्रहण सुटत नसल्याचेच चित्र आहे. गेल्या दोन-तीन वर्षांत अनेक आयोजकांनी माघार घेतली आहे. प्रायोजकांनीही उत्सवातून काढता पाय घेतला आहे. दहीहंडीच्या बक्षीस रकमाही कमी झाल्या आहेत. परिणामी, अनेक गोविंदा पथकांसमोर आर्थिक अडचण निर्माण झाली आहे. त्यातच विम्याची रक्कम वाढविण्यात आली आहे. अशा परिस्थितीत उत्सवाचा उत्साह टिकवण्याचे काम गोविंदा करणार आहेत. या पार्श्वभूमीवर ‘लोकमत’चे प्रतिनिधी अक्षय चोरगे यांनी दहीहंडी समन्वय समितीचे अध्यक्ष बाळा पडेलकर यांच्याशी केलेली ही खास बातचीत.

Web Title: Govind's accidental accident of Dahihandi

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.