मोठी बातमी! कोरोनामुक्त गावात शाळा सुरू करण्याबाबतचा शासन निर्णय मागे
By ऑनलाइन लोकमत | Published: July 6, 2021 10:41 AM2021-07-06T10:41:57+5:302021-07-06T10:47:27+5:30
शिक्षण विभागाचा यु टर्न, गुलदस्त्यातील कारणामुळे शिक्षण विभागाच्या घाई गडबडीवर प्रश्नचिन्ह
मुंबई - कोविडमुक क्षेत्रात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या संमतीने ८ वी ते बारावीचे वर्ग प्रत्यक्षात सुरू करण्याचा निर्णय सोमवारी शिक्षण विभागाकडून जारी करण्यात आला, मात्र अवघ्या काही तासांतच या निर्णयाबाबत विभागाने यु टर्न घेतला आहे. निर्णयात काही तांत्रिक त्रुटी असून त्यातील दुरुस्तीच्या कारणावरून तो शासन निर्णयाच्या संकेतस्थळावरून हटविण्यात आला आहे. दरम्यान आवश्यक त्या दुरुस्ती करून तो पुन्हा जारी करण्यात येईल अशी माहिती शिक्षण विभागातील अधिकारी देत असले तरी शिक्षण विभागातील असमन्वय आणि घाई गडबडीत घेतलेले निर्णय यावरून समोर येत असल्याच्या चर्चा शिक्षण क्षेत्रात रंगू लागल्या आहेत.
स्थानिक स्वराज्य संस्था आणि शाळांच्या मदतीने कोविडमुक्त क्षेत्रात शाळा सुरू करण्यासाठी सोमवार , 5 जुलै रोजी शिक्षण विभागाकडून मार्गदर्शक सूचना जारी करण्यात आल्या आहेत. मात्र, रात्री उशिरा संकेतस्थळावरून तो हटविण्यात आल्याने त्याच्या अमलबजावणीबाबत शंका उपस्थित करण्यात आल्या आहेत. दरम्यान शाळा सुरू करण्याआधी स्थानिक पातळीवरील अहवाल मागवून घेण्यात येणार आहे आणि जिल्ह्यातील आढावा घेण्यात येईल असे सांगण्यात येत आहे. त्याचप्रमाणे पालकांची आणि मुख्याध्यापकांची संमती आवश्यक असणार आहे, त्यामुळे या तांत्रिक बाबी ही शासन निर्णयात नमूद करण्यात येतील अशी माहिती मिळत आहे.
या दुरुस्त्यानंतरच शाळा सुरू करण्याचा निर्णय घेण्यात येणार असून नवीन शासन निर्णय जारी करण्यात येईल अशी माहिती सूत्रांकडून मिळत आहरे. दरम्यान काल रात्री हटविण्यात आलेल्या शासन निर्णयाची माहिती अद्याप शिक्षण विभागातील अधिकाऱ्यांना नसल्याने गोंधळाचे वातावरण होऊन संभ्रम निर्माण झाला आहे.