नवी दिल्ली - केंद्र सरकारसह आता राज्य सरकारच्या कर्मचाऱ्यांसाठीही आनंदाची बातमी आहे. कारण, सरकारने त्यांच्या पगारात आता वाढ केली आहे. केंद्रीय कर्मचाऱ्यांना मिळणाऱ्या महागाई भत्त्यात वाढ करण्यात आली असून ३८ टक्क्यांवरुन महागाई भत्ता ४२ टक्क्यांवर पोहोचला आहे. त्याचा लाभ आता राज्य सरकारच्या कर्मचाऱ्यांनाही मिळणार आहे. त्यामुळे, सरकारी नोकरदारांना आणखी पगार वाढून मिळणार आहे. राज्य सरकारने यासंदर्भात शासन निर्णय जारी केला असून राज्य सरकारी कर्मचारी व इतर पात्र पूर्णकालिक कर्मचाऱ्यांना शासनाच्या या निर्णयाचा लाभ होणार आहे. केंद्र सरकारने ३ एप्रिल २०२३ रोजी केलेली महाभाई भत्त्यातील वाढ आता महाराष्ट्र सरकारनेही लागू केली आहे.
देशातील अनेक राज्यांत सरकारी कर्मचाऱ्यांच्या वेतनामध्ये गेल्या काही दिवसांपासून वाढ होताना दिसत आहे. केंद्र सरकारने सरकारी कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यात (Dearness Allowance) वाढ केल्यानंतर राज्यांत देखील ही वाढ करण्यात आली आहे. जुलै २०२१ मध्ये दीर्घ कालावधीनंतर केंद्र सरकारने (Central Government) केंद्रीय कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता १७ टक्क्यांवरुन २८ टक्के केला होता. त्यानंतर, ऑक्टोबर २०२१ मध्ये, आणखी ३ टक्के वाढ देऊन तो ३१ टक्के करण्यात आला. मग, सरकारने मार्च २०२२ मध्ये कर्मचाऱ्यांच्या डीएमध्ये पुन्हा ३ टक्क्यांनी वाढ केली होती. या वाढीनंतर कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता ३१ टक्क्यांवरुन ३४ टक्के करण्यात आला. त्यानंतर तो ३८ टक्क्यांपर्यंत पोहोचला होता. आता, ह्याच महागाई भत्त्यात ३८ ते ४२ टक्क्यांपर्यंत वाढ करण्यात आली आहे.
दरम्यान, महागाई भत्ता हा वर्षातून दोनदा वाढवला जातो. सरकार काही परिस्थितींमध्ये हा भत्ता वाढवणं टाळू देखील शकतं. महागाई भत्ता हा सहा महिने आधी लागू केला जातो. म्हणजेच पहिल्या महगाई भत्त्यातील वाढ ही जानेवारीत होते. तर दुसऱ्या भत्त्यातील वाढ ही जुलैमध्ये होते. त्यानुसार, आता यंदाच्या वर्षातील दुसऱ्या महागाई भत्त्याची वाढ करण्यात आली आहे.
ऑल इंडिया कन्ज्युमर प्राईस इंडेक्स म्हणजेच (AICPI) च्या आधारे महाभाई भत्ता ठरवण्यात येतो. दर महिन्याच्या अखेरीस हे नंबर्स जारी केले जातात. त्यामुळेच, केंद्रीय कर्मचाऱ्यांना या डीएची प्रतिक्षा असते. त्यावरुनच, पुढील ६ महिन्यांपर्यंत डीएचा स्कोर काय राहिले हेही समजते.