Join us

सरकारी रुग्णालयांत औषधे मिळणार ५० टक्क्यांपर्यंत स्वस्त; जे.जे.त मिळणार आता जेनेरिक औषधे

By ऑनलाइन लोकमत | Published: August 17, 2023 12:23 PM

जेनेरिक औषधे स्वस्त आणि उपचाराला प्रतिसाद देणारी असतात.

लोकमत न्यूज नेटवर्क, मुंबई : वैद्यकीय शिक्षण विभागाच्या अधिपत्याखालील १८ वैद्यकीय आणि दंत महाविद्यालयांशी संलग्न रुग्णालयात आता ‘जेनेरिक’ औषधे मिळणार आहेत. त्यासाठी केंद्र सरकार पुरस्कृत बहुराज्यीय सहकारी संस्थेची नियुक्ती केली आहे. त्यामुळे लवकरच रुग्णालयाच्या आवारात संस्थेमार्फत जेनेरिक औषधांची दुकाने सुरू होणार आहेत. या संदर्भातील निर्णय वैद्यकीय शिक्षण विभागाने घेतला आहे. त्यामुळे जे. जे. रुग्णालयातही आता ही औषधे मिळणार असून विशेष म्हणजे ही औषधे ब्रँडेड औषधांपेक्षा स्वस्त असल्याने ५० टक्क्यापर्यंत स्वस्त असल्याचे सांगितले जात आहे. 

जेनेरिक औषधे स्वस्त आणि उपचाराला प्रतिसाद देणारी असतात. त्यामुळे काही प्रमाणात औषधांची दुकाने राज्यात विविध ठिकाणी उघडली गेली आहेत. अशी दुकाने रुग्णालयाच्या परिसरात सुरू केल्यास रुग्णांना त्याचा फायदा होण्याची शक्यता आहे. या संस्थांना जागेचे क्षेत्रफळ, जागेचा भाडेपट्टा, भाडेपट्ट्याचा कालावधी तसेच त्याच्या अटी-शर्ती तयार करण्याची जबाबदारी  विभागाच्या आयुक्तांची असणार आहे.

नगरविकास विभागाच्या धर्तीवर वैद्यकीय महाविद्यालयाशी संलग्न रुग्णालयात जेनेरिक औषधांची दुकाने सुरू करण्याची परवानगी देण्याचा निर्णय घेतला आहे. ज्या महाविद्यालयांना जेनेरिक औषधांची दुकाने उघडण्यासाठी परवानगी दिली नव्हती, अशा १४ आणि ज्या महाविद्यालयात एचएलएस संस्थेमार्फत परवानगी दिली होती. ज्यांचा करार संपला आहे अशा चार म्हणजे एकूण १८ वैद्यकीय महाविद्यालयांना आता जेनेरिक औषधांची दुकाने रुग्णालय परिसरात सुरू करता येणार आहेत.

दुकाने काढण्याची दिली परवानगी

- वैद्यकीय शिक्षण विभागाने नॅशनल फेडरेशन ऑफ फार्मर्स प्रोक्युरमेंट प्रोसेसिंग ॲन्ड रिटेलिंग को-ऑपरेटिव्ह ऑफ इंडिया (एनएसीओएफ) या संस्थेला राज्यातील विविध वैद्यकीय महाविद्यालयांत औषधांची दुकाने काढण्याची परवानगी दिली आहे.

- विशेष म्हणजे, नगरविकास विभागाने नागरी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या अंतर्गत येणाऱ्या रुग्णालयाच्या परिसरात केंद्र सरकारच्या जेनेरिक औषधे योजनेंतर्गत एनएसीओएफ या संस्थेस जेनेरिक औषधांची दुकाने सुरू करण्यास परवानगी दिली आहे.

- जेनेरिक औषधे उपलब्ध नसल्यास ब्रँडेड औषधांच्या दर्शनी मूल्यावर किमान पाच टक्के सवलत देणे बंधनकारक राहील. 

- तसेच हे दुकान रुग्णालयाच्या परिसरात असल्याने त्या ठिकणी रुग्णांसाठी दुकान चालकांना २४ तास सेवा द्यावी लागणार आहे. - औषध दुकानातील खरेदी- विक्रीसाठी किमान तीन रजिस्टर औषध निर्मात्याची नेमणूक करणे बंधनकारक राहील.

आमच्याकडे सध्या जेनेरिक औषध देणारे दुकान उघडले असून त्या ठिकाणी जेनेरिक औषधे मिळतील, अशी व्यवस्था सरकारने केली आहे. तसेच आम्ही आमच्या रुग्णालयातील डॉक्टरांनाही त्यांनी जेनेरिक औषधे लिहून द्यावीत, यासंदर्भात पत्रक काढले आहे. ते पत्रक सर्व डॉक्टरांना पाठविण्यात आले आहे. - डॉ. संजय सुरासे, अधीक्षक, सर जे जे रुग्णालय.

 

टॅग्स :हॉस्पिटलजेनरिक औषधं