Join us

ड्रग्जविरोधात सरकार ॲक्शन मोडवर...!; ४००० कोटींचा माल केला जप्त

By ऑनलाइन लोकमत | Published: July 12, 2024 10:16 AM

ड्रग्जमाफियांशी संगनमत करणाऱ्या सहा पोलिसांना बडतर्फ केल्याची माहिती गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानपरिषदेत दिली. 

मुंबई : राज्यात तरुण पिढी ड्रग्ज विळख्यात सापडली आहे. ड्रग्जमाफियांचा बीमोड करण्यासाठी राज्य सरकार ॲक्शन मोडवर आले आहे. या पार्श्वभूमीवर अमली पदार्थ विरोधी पथकांनी कारवाईचा धडाका सुरू केला. त्यानुसार अवघ्या पाच महिन्यांत ६,५२९ कारवाया केल्या असून, ४ हजार १३१ कोटींचा माल जप्त केला.  ड्रग्जमाफियांशी संगनमत करणाऱ्या सहा पोलिसांना बडतर्फ केल्याची माहिती गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानपरिषदेत दिली. 

आमदार भाई जगताप यांनी तारांकित प्रश्नाद्वारे मुंबईसह राज्यातील वाढत्या ड्रग्ज विक्रीच्या घटनांकडे लक्ष वेधले. यावर फडणवीस म्हणाले, राज्यात अमली पदार्थाचे मोठे आव्हान उभे असून चिंतेचा विषय बनला आहे. 

केंद्र सरकारने सर्व राज्यांच्या गृहमंत्र्यांना ‘संयुक्त कृती आराखडा’ सादर केला. कुरिअर मार्फत, इन्स्टाग्राम, फेसबुक चॅट किंवा अन्य मेसेंजरच्या माध्यमातून ड्रग्ज विक्री होत असल्याचे समोर आले आहे. तंत्रज्ञानाच्या साहाय्याने होणारी विक्री हे मोठे आव्हान बनले आहे. त्यामुळे शून्य सहनशीलता धोरण शासनाने हाती घेतले आहे. या पार्श्वभूमीवर प्रत्येक जिल्ह्यात अमली पदार्थ विरोधी पथक नेमले आहेत. 

२०२३ मध्ये १२ हजार ६४८ कारवाया 

सन २०२३ मध्ये मुंबईत ४ कोटी रुपयांचा माल पकडला होता. तर संपूर्ण महाराष्ट्रात मागील वर्षी १२ हजार ६४८ कारवाया करण्यात आल्या. त्यात ८९७ कोटी रुपयांचा माल मिळाला होता.

यंदा जानेवारी ते मे महिन्यापर्यंत ६ हजार ५२९ कारवाया केल्या. यात ४ हजार १३१ कोटी रुपयांचा माल जप्त केल्याची माहिती फडणवीस यांनी दिली.

ड्रग्ज स्कॅनरची नजर

सर्वांची एकत्रित बैठक घेऊन  सविस्तर अहवाल राज्य सरकार आणि केंद्र सरकारला पाठवावा, अशी सक्ती केली आहे.  बंदरे असो किंवा अन्य ठिकाणच्या वाहतुकीवर नजर ठेवण्यासाठी ड्रग्ज स्कॅनर लावले आहेत. त्यामुळे कुठलाही अमली पदार्थ शोधण्यास मदत होईल. 

फॉरवर्ड लिंकेज आणि बॅकवर्ड लिंकेज शोधण्यासाठी पुढाकार घेतला आहे. यातूनच एका प्रकरणाची लिंक उत्तराखंडला मिळाली, अशी माहिती फडणवीस यांनी दिली.