दिव्यांगांसाठी सरकारने विनामूल्य मैदाने उपलब्ध करून द्यावीत - खा. गोपाळ शेट्टी
By मनोहर कुंभेजकर | Published: December 4, 2023 02:52 PM2023-12-04T14:52:12+5:302023-12-04T14:53:09+5:30
स्नेहज्योत दिव्यांग सेवा प्रतिष्ठानचा क्रीडा महोत्सव उत्साहात साजरा
मुंबई : दहिसर स्पोर्ट्स फौंडेशन, शिवसेवा सामाजिक शिक्षण सेवा संस्था, पोयसर जिमखाना, मातोश्री स्पोर्ट्स फौंडेशन अशा संस्था समाजातील सर्वच थरातील लोकांना विविध प्रकारच्या सुविधा उपलब्ध करीत असतात. परंतू दिव्यांगांसाठी सरकारने विनामूल्य मैदाने उपलब्ध करून द्यावीत, त्या त्या संस्थांना विनामूल्य जागा उपलब्ध करून द्याव्यात, अशी आग्रही मागणी उत्तर मुंबईचे स्थानिक खासदार गोपाळ शेट्टी यांनी केली.
दहिसर येथील स्नेहज्योत दिव्यांग सेवा प्रतिष्ठानच्या क्रीडा महोत्सवासाठी दहिसर स्पोर्ट्स फौंडेशन चे मैदान मोफत उपलब्ध करुन दिल्याबद्दल शिवसेना उपनेते डॉ.विनोद घोसाळकर यांची त्यांनी मुक्तकंठाने प्रशंसा केली. स्नेहज्योत दिव्यांग सेवा प्रतिष्ठानच्या वतीने दिव्यांगांसाठी दहिसर स्पोर्ट्स फौंडेशन च्या विस्तीर्ण मैदानावर दिव्यांगांच्या विविध प्रकारच्या क्रीडा स्पर्धांचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी माजी आमदार डॉ.विनोद घोसाळकर, ज्येष्ठ राजकीय विश्लेषक योगेश त्रिवेदी, शिवचरित्राचे गाढे अभ्यासक शिवभक्त राजू देसाई, कॅप्टन दत्तात्रेय जोशी, शिक्षणतज्ज्ञ महादेव रानडे, संदिप दळवी आदी मान्यवर यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते.
विनोद घोसाळकर यांनी आपल्या भाषणात सांगितले की, स्नेहज्योत दिव्यांग सेवा प्रतिष्ठानचा कोणताही कार्यक्रम कधीही आयोजित केला तर त्यांना हे मैदान देऊन आम्ही दिव्यांगांची एकप्रकारे सेवाच करु. दहिसर स्पोर्ट्स फौंडेशन चे मैदान विनामूल्य उपलब्ध करून देण्यात येईल, अशी ग्वाही देतानाच विनोद घोसाळकर यांनी या दिव्यांगांतूनच मोठ्या व्यक्ती नावारुपाला येतील, असा विश्वास व्यक्त केला.
स्नेहज्योत दिव्यांग सेवा प्रतिष्ठानच्या अध्यक्षा अपर्णा कायकिणी, कार्यवाह सुधा वाघ, दादा पटवर्धन, मिलिंद तेंडुलकर, दिपक पराडकर आदी पदाधिकाऱ्यांनी हा क्रीडा महोत्सव यशस्वी करण्यासाठी अथक परिश्रम घेतले. या कार्यक्रमासाठी 150 दिव्यांगांनी सहभाग घेतला होता 70 कार्यकर्ते या कार्यक्रमाच्या नियोजनासाठी परिश्रम घेत होते.