जे श्रद्धासोबत घडलं तर इतरांसोबत होऊ नये; राज्य सरकारनं उचललं पाऊल
By ऑनलाइन लोकमत | Published: December 14, 2022 03:24 PM2022-12-14T15:24:41+5:302022-12-14T15:25:02+5:30
लव्ह जिहादविरोधात ही समिती नसून ज्या मुली कुटुंबापासून विभक्त झाल्या आहेत. त्यांच्या अडचणीत त्यांना मदत करण्यासाठी नेमली आहे असं लोढा यांनी सांगितले.
मुंबई - लिव्ह इन रिलेशनशिपमधून झालेल्या श्रद्धा वालकर हत्या प्रकरण लक्षात घेता राज्य सरकारकडून मोठं पाऊल उचलण्यात आले आहे. अनेकदा मुलांची लग्न ही पालकांच्या मनाविरूद्ध होतात. त्यानंतर संबधित मुलीबाबत चुकीच्या गोष्टी घडतात. त्या मुलींना एक आधार म्हणूनही समिती नेमलेली आहे. श्रद्धा वालकर प्रकरण हे एक उदाहरण आहे. जे श्रद्धासोबत झालं ते इतरांसोबत होऊ नये यासाठी राज्य सरकारनं समितीची स्थापना केल्याची माहिती महिला व बालविकास मंत्री मंगलप्रभात लोढा यांनी दिली आहे.
मंत्री मंगलप्रभात लोढा म्हणाले की, पोलीस यंत्रणा यापूर्वी होती तरी श्रद्धा वालकर प्रकरण झालचं, त्यामुळे राज्यात १३ सदस्यीय आंतरधर्मीय विवाह कुटुंब समन्वय समिती स्थापन करण्यात आली आहे. ही समिती ज्या मुलामुलींनी आंतरधार्मीय विवाह केला आहे. ज्या मुली ज्यांचा कुटुंबियांशी संबध तुटलेला आहे. त्याच्यासाठी ही समिती काम करेल. या मुलींसाठी टोल फ्री नंबर सुरू करण्याचा आमचा मानस आहे असं त्यांनी सांगितले.
तसेच लव्ह जिहादविरोधात ही समिती नसून ज्या मुली कुटुंबापासून विभक्त झाल्या आहेत. त्यांच्या अडचणीत त्यांना मदत करण्यासाठी नेमली आहे. या समितीचं कार्यक्षेत्र मर्यादित आहे. महिला आयोग व महिला व बाल कल्याण विभाग यांच्यात चांगलं समन्वय आहे. वादविवाद होऊ नये आणि पुन्हा श्रद्धा वालकरसारखे प्रकरण घडू नये यासाठी ही समिती काम करणार असल्याचंही लोढा यांनी सांगितले.
लवकरच शिवसृष्टी पूर्ण होईल
शिवसृष्टी प्रकल्प हा पुण्याजवळ १० वर्षापासून सुरूआहे. महाराजांच्या जन्मापासूनचे अनेक प्रसंगाचे देखावे उभे केले जाणारआहे. लवकरच महाराजांच्या स्वराज्य निर्मितीला ३५० वर्ष पूर्ण होणार असून तो पर्यंत शिवसृष्टीचे काम पूर्ण होईल असा विश्वास पर्यटनमंत्री मंगलप्रभात लोढा यांनी व्यक्त केला.