स्थलांतराच्या अभ्यासासाठी पक्ष्यांवर ‘जीपीएस’, ‘जीएसएम’ टॅग

By ऑनलाइन लोकमत | Published: February 17, 2020 02:18 AM2020-02-17T02:18:03+5:302020-02-17T02:18:22+5:30

देशात पहिल्यांदाच होणार वापर : बीएनएचएस १० पक्ष्यांवर करणार प्रयोग

GPS ',' GSM 'tags on birds for migration studies | स्थलांतराच्या अभ्यासासाठी पक्ष्यांवर ‘जीपीएस’, ‘जीएसएम’ टॅग

स्थलांतराच्या अभ्यासासाठी पक्ष्यांवर ‘जीपीएस’, ‘जीएसएम’ टॅग

Next

सागर नेवरेकर 

मुंबई : बॉम्बे नॅचरल हिस्ट्री सोसायटी पक्ष्यांच्या स्थलांतराचा अभ्यास करण्यासाठी पक्ष्यांवर ‘जीपीएस’ व ‘जीएसएम’ टॅग या नव्या तंत्रज्ञानाचा वापर करणार आहे. बीएनएचएस एकूण दहा पक्ष्यांवर हे टॅग लावणार आहे. यात ग्रेटर फ्लेमिंगो, लेसर फ्लेमिंगो, कर्लीव्ह्यू आणि आयबीस इत्यादी प्रजातींच्या पक्ष्यांवर टॅग लावून स्थलांतराची माहिती गोळा केली जाणार आहे. ‘जीपीएस’ व ‘जीएसएम’ या पद्धतीचा वापर देशात पहिल्यांदा केला जात आहे. स्थलांतरित पक्ष्यांचा अभ्यास करून त्यांचे संरक्षण व संवर्धनात हातभार लागावा, हा याचा मुख्य उद्देश आहे.

याबाबत बॉम्बे नॅचरल हिस्ट्री सोसायटीचे सहायक संचालक राहुल खोत म्हणाले, टॅग लावण्याची पूर्वतयारी सुरू आहे. परंतु टॅग लावण्यासाठी लागणारे साहित्य स्वीडनमधून मागवावे लागते. यातील बरेचसे साहित्य उपलब्ध झाले आहे, तसेच या प्रयोगाला राज्य सरकारची परवानगी मिळाली असून, फक्त केंद्रीय सरकारची परवानगी मिळणे बाकी आहे. परवानगी मिळाली की, लगोलग कामाला सुरुवात होईल. यापूर्वी पक्षी स्थलांतराचा अभ्यास करण्यासाठी पायाला रिंग लावणे, प्लास्टीक फ्लॅग लावणे इत्यादी प्रयत्न केले, परंतु त्यातून संपूर्ण माहिती उपलब्ध झाली नाही, असे खोत यांनी सांगितले.

असा होणार टॅगचा वापर!
सध्या गिधाडांच्या स्थलांतराचा अभ्यास करण्यासाठी पीटीटी टॅगची परवानगी मिळाली. पीटीटी टॅग (प्लॅटफॉर्म ट्रान्समीटर टर्मिनल) हे सॅटेलाइटशी जोडलेले असते, परंतु तांत्रिक अडचणीमुळे पीटीटी टॅग पक्ष्यांना लावणे थांबविण्यात आले, तसेच पीटीटी टॅगची पद्धत खूप खर्चिक असते. म्हणून खर्च कमी करणारी तिसरी पद्धत म्हणजे ‘जीपीएस’ व ‘जीएसएम’ टॅग या पद्धतीचा वापर केला जाणार आहे.
ही टेक्नॉलॉजी सोलर पॉवरवर चालते. जीपीएसमध्ये जिथे पक्षी आढळून येईल, त्या ठिकाणाची नोंद केली जाते, तर जीएसएम टॅगमध्ये एक सिम कार्ड असते. पक्ष्यांच्या उडण्याचे ठिकाण, उडण्याचा मार्ग, वेग, वेळ, समुद्र सपाटीपासूनची उंची इत्यादी माहिती दर दोन तासांत उपलब्ध होणार आहे.

Web Title: GPS ',' GSM 'tags on birds for migration studies

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.