मुंबई - गणेशोत्सवासाठी कोकणात जाणाऱ्या चाकरमान्यांना आनंदाची बातमी असून, मुंबई - कोल्हापूर मार्गे कोकणात जाणाऱ्या वाहनांना 30 ऑगस्ट ते 12 सप्टेंबर 2019 पर्यंत टोल माफ करण्याचा शासन निर्णय आज जारी करण्यात आला आहे. त्यामुळे कोकणात खासगी वाहनांनी जाणाऱ्या वाहनचालकांनी पोलीस स्थानकातून टोल पास घ्यावेत, असे आवाहन करण्यात आले आहे. कोकणात जाणाऱ्या रस्त्यांच्या स्थिती संदर्भात नुकतीच बैठक मंत्री चंद्रकांत दादा पाटील यांच्या मंत्रालयातील दालनात झाली होती. या बैठकीत गणेशोत्सवासाठी कोकणात जाणाऱ्या चाकरमान्यांचा प्रवास आणखी सुखकर व्हावा, यासाठी मुंबई - कोल्हापूर मार्गे कोकणात जाणाऱ्या वाहनांना 30 ऑगस्ट ते 12 सप्टेंबर 2019 पर्यंत टोल माफ करण्याचा निर्णय त्यावेळी घेण्यात आला होता. त्यासंबंधीचा शासन निर्णय आज सार्वजनिक बांधकाम विभागाने जारी केला आहे. गणेशोत्सवासाठी मुंबई-पुणे-कागल मार्गे कोकणात जाणाऱ्या भाविकांना एक स्टिकर पास देण्यात येणार आहेत. हा पास 12 सप्टेंबर रोजी परतीच्या प्रवासात ग्राह्य धरण्यात येणार आहे. तसेच, मुंबई-पुणे प्रवासात व पुणे- कोल्हापूर कागल मार्गे कोकणात जाणाऱ्या प्रवाशांसाठी मुंबई (वाशी), पुणे-मुंबई एक्सप्रेस वे, किणी तावडे येथील पथकर नाक्यांवर महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाच्या बसेसना पथकरातून सूट देण्यात येणार आहे. याबाबतच्या सुचना सदर शासन निर्णयानुसार संबंधित विभागांना देण्यात आल्या आहेत.
गणेशोत्सवासाठी कोकणात जाणाऱ्या वाहनांना टोल माफीचा शासन निर्णय जारी
By ऑनलाइन लोकमत | Published: August 29, 2019 4:42 PM