Join us

मुंबईच्या व्यापाऱ्याकडून ७२ ग्रॅम युरेनियम हस्तगत

By admin | Published: January 04, 2017 1:09 AM

गेल्या आठवड्यात ठाण्याच्या घोडबंदर रोडवरुन सैफुल्ला खान (३७) आणि किशोर प्रजापती (५९) यांच्याकडून सुमारे आठ किलो युरेनियम ठाणे गुन्हे अन्वेषण विभागाने हस्तगत

ठाणे : गेल्या आठवड्यात ठाण्याच्या घोडबंदर रोडवरुन सैफुल्ला खान (३७) आणि किशोर प्रजापती (५९) यांच्याकडून सुमारे आठ किलो युरेनियम ठाणे गुन्हे अन्वेषण विभागाने हस्तगत केले होते. या दोघांच्या चौकशीतूनच आणखी ७२ ग्रॅम युरेनियम मुंबईतील खार भागातील एका व्यापाऱ्याकडून हस्तगत केल्याची माहिती सूत्रांनी दिली.जगभरात ‘इसिस’मार्फत सुरु असलेल्या अतिरेकी हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर, अ‍ॅटोमिक एनर्जी संदर्भातील तसेच देशाच्या संरक्षणाच्या दृष्टीने गुन्ह्याचे गांभीर्य लक्षात घेऊन याबाबतची प्रत्येक सुनावणी ठाणे न्यायालयात ‘इन कॅमेरा’ घेण्यात येत आहे. प्रत्येक वेळी वेगवेगळी माहिती देऊन दिशाभूल करणाऱ्या खान आणि प्रजापती यांच्याच माहितीच्या आधारावर सोमवारी खार भागात छापा टाकून एका व्यापाऱ्याकडून डोईफोडे यांच्या पथकाने पोलीस आयुक्त परमवीर सिंग, अतिरिक्त पोलीस आयुक्त मकरंद रानडे यांच्या मार्गदर्शनाखाली हे ७२ ग्रॅम युरेनियम हस्तगत केले. ‘ही एक महत्त्वाची वस्तू असून यासाठी कुठे गिऱ्हाईक असेल तर बघ,’ असे व्यापाऱ्याला प्रजापतीने सांगितले होते. त्या व्यापाऱ्याने मात्र हे काहीतरी लोखंडासारखे असल्याचे वाटल्यामुळे त्याकडे दुर्लक्ष करुन ते एका बाजूला ठेवले होते. पोलीस चौकशीला आल्यावरच आपल्याला हे युरेनियम असल्याचे समजल्याचा दावा त्याने चौकशीत केला. सध्या त्याची चौकशी सुरु असल्याने त्याच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला नसल्याचे पोलिसांनी सांगितले. (प्रतिनिधी)