मुंबई : कांदिवली पोलिसांनी केलेल्या कारवाईत व्यसनांसाठी वापरल्या जाणाऱ्या औषधांचा एक मोठा साठा सोमवारी हस्तगत करण्यात आला. या औषधांची किंमत बाजारात कोटींच्या घरात आहे. या प्रकरणी एकाला अटक करण्यात आली आहे.किशोर नंदन (४७) असे अटक करण्यात आलेल्या इसमाचे नाव आहे. तो घोडबंदर रोडच्या लोढा कॉम्प्लेक्समधील रहिवासी आहे. व्यवसायाने वायरमन असलेला नंदन कांदिवलीच्या यू हॉटेलजवळ व्यसनांसाठी वापरण्यात येणाऱ्या औषधांच्या विक्रीसाठी येणार असल्याची माहिती कांदिवलीचे साहाय्यक पोलीस निरीक्षक प्रदीप केरकर यांना मिळाली. त्यानुसार त्यांनी या परिसरात सापळा रचला. तेव्हा एक स्कॉर्पिओ जीप या परिसरात संशयास्पद रीतीने फिरताना दिसली. पोलिसांनी ती अडवली. या जीपच्या झडतीत पोलिसांनी १ कोटी १२ लाख ८५ हजार रुपये किमतीचा मुद्देमाल हस्तगत केला आहे. या प्रकरणी नंदनवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. नंदनला सोमवारी स्थानिक न्यायालयात हजर करण्यात आले. तेव्हा न्यायालयाकडून त्याला १७ नोव्हेंबरपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. नंदनने यापूर्वीदेखील अशा प्रकारे औषधांची ने-आण केल्याचा संशय पोलिसांना आहे. त्यानुसार ही औषधे त्याने कोणाकडून आणली तसेच तो ती कोणाला विकणार होता, त्याच्यासोबत अन्य काही लोक सहभागी आहेत का, याची चौकशी सध्या पोलीस करत आहेत. (प्रतिनिधी)
कोट्यवधींची औषधे हस्तगत
By admin | Published: November 15, 2016 5:01 AM