मुंबई विद्यापीठात पदवीधर घटले; संशोधनकार्य मात्र वाढले

By रेश्मा शिवडेकर | Published: January 30, 2024 01:11 PM2024-01-30T13:11:19+5:302024-01-30T13:11:42+5:30

Mumbai University : वाणिज्य, विज्ञान, अभियांत्रिकी अशा सर्वच विद्याशाखांच्या पदवी आणि पदव्युत्तर अभ्यासक्रमांचा निकाल घटल्याने यंदा मुंबई विद्यापीठाच्या पदवीधरांची संख्या कमालीची रोडावली आहे.

Graduates drop at Mumbai University; However, the research work increased | मुंबई विद्यापीठात पदवीधर घटले; संशोधनकार्य मात्र वाढले

मुंबई विद्यापीठात पदवीधर घटले; संशोधनकार्य मात्र वाढले

- रेश्मा शिवडेकर
मुंबई  - वाणिज्य, विज्ञान, अभियांत्रिकी अशा सर्वच विद्याशाखांच्या पदवी आणि पदव्युत्तर अभ्यासक्रमांचा निकाल घटल्याने यंदा मुंबई विद्यापीठाच्या पदवीधरांची संख्या कमालीची रोडावली आहे. एरवी विद्यापीठ दोन लाखांच्या आसपास विद्यार्थ्यांना पदवी प्रदान करते. परंतु, यंदा अवघे दीड लाख विद्यार्थी पदवीपात्र ठरले आहेत. हा आकडा गेल्या सात वर्षांतील सर्वात कमी आहे. 

यंदा मुंबई विद्यापीठ सुमारे दीड लाख विद्यार्थ्यांना पदवी प्रदान करणार आहे. कोरोना काळात लागलेल्या लॉकडाऊनचे विद्यार्थ्यांच्या अभ्यासावर झालेले दुष्परिणाम गेल्या दोन वर्षांत विविध निकालांच्या निमित्ताने दिसून आले. त्यामुळे विद्यापीठाच्या एकूण पदवीधरांमध्ये यंदा चांगलीच घट झाली आहे. या नकारात्मक निकालाच्या नेमके उलट चित्र संशोधनाबाबत दिसून येत आहे. कोरोना काळात संशोधनाचे काम थंडावल्याने रखडलेल्या पीएच.डी.  २०२२-२३ या शैक्षणिक वर्षात मार्गी लागल्याचे दिसून येत येत आहे. त्यामुळे, ४२५ इतक्या पीएच.डी. मुंबई विद्यापीठ यंदा फेब्रुवारीत होणाऱ्या पदवीदान समारंभात प्रदान 
करणार आहे.

शैक्षणिक नुकसान
     विद्यापीठाच्या पदवीधरांची संख्या साधारणपणे 
पावणेदोन लाखांच्या आसपास राहिली आहे. कोरोना काळात वर्ग भरविता येणे शक्य नसल्याने विद्यार्थ्यांची परीक्षा ऑनलाइन घेण्यात आली. 
     बहुपर्यायी स्वरूपाचे प्रश्न, अंतर्गत मूल्यमापन यांमुळे २०२१ आणि २०२२ या वर्षांत परीक्षांचे निकाल कमालीचे फुगले होते. 
     कोरोना काळात पहिल्या व दुसऱ्या वर्षाला असलेल्या विद्यार्थ्यांचे प्रत्यक्ष वर्ग न भरल्याने कमालीचे नुकसान झाले आहे. त्याचे परिणाम आता विद्यापीठाकडून घेतल्या जाणाऱ्या परीक्षांच्या निकालांवर दिसून येत आहे.
 

यूजीसीचे अध्यक्ष प्रमुख पाहुणे   
मुंबई विद्यापीठाच्या ७ फेब्रुवारीला होणाऱ्या वार्षिक दीक्षांत समारंभाकरिता ‘विद्यापीठ अनुदान आयोगा’चे अध्यक्ष प्रा. एम. जगदेश कुमार हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहेत. सकाळी ११ वाजता सर कावसजी जहांगीर दीक्षांत सभागृहात हा समारंभ होईल. समारंभाचे अध्यक्षस्थान राज्यपाल भूषवतील. तर सन्माननीय पाहुणे म्हणून राज्याचे उच्च व तंत्र शिक्षणमंत्री चंद्रकांत पाटील उपस्थित राहणार आहेत. विद्यापीठाचे कुलगुरू प्रा. रवींद्र कुलकर्णी, प्र. कुलगुरू प्राचार्य डॉ. अजय भामरे आणि कुलसचिव प्रा. बळीराम गायकवाड यांच्या उपस्थितीत हा कार्यक्रम पार पडेल.

Web Title: Graduates drop at Mumbai University; However, the research work increased

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.