गुन्हा दाखल करत अटकेची कारवाई, ८ जून पर्यंत कोठड़ी
धान्य घोटाळ्यातील आरोपी अजय बाहेती ‘ईडी’च्या जाळ्यात
लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : राज्यभर गाजलेल्या नांदेडच्या नायगाव, कृष्णूर येथील धान्य घोटाळ्यात अंमलबजावणी संचालनालयाने उडी घेतली आहे. गुरुवारी (दि. २४) यातील मुख्य आरोपी असलेल्या इंडिया अँँग्रो अनाज लिमिटेड कंपनीचा मालक अजय बाहेती याच्याविरुद्ध मनी लॉन्ड्रिंगअंतर्गत गुन्हा नोंदवत ईडीने त्याला अटक केली. शुक्रवारी न्यायालयाने त्याला ८ दिवसांची कोठडी सुनावली आहे.
नांदेडच्या नायगाव, कृष्णूर येथील एमआयडीसीमध्ये अजय बाहेती यांची इंडिया अँँग्रो अनाज लिमिटेड नावाची कंपनी आहे. बाहेती हा अन्नपुरवठा विभाग व धान्य वितरण करणारी यंत्रणेला हाताशी धरून शासकीय वितरणाचा गहू व तांदूळ चोरीच्या मार्गे थेट आपल्या कंपनीत उतरवून घेत होता. त्यावेळी तत्कालीन पोलीस अधीक्षक चंद्रकिशोर मीणा यांच्या मार्गदर्शनाखाली त्याच्या कंपनीमध्ये धान्याची अवैध वाहतूक होत असताना ११ ट्रक पकडण्यात आले. कुंटूर पोलीस ठाण्यात ११ ट्रकचालकासह मुख्य आरोपी अजय बाहेती, व्यवस्थापक ओमप्रकाश तापडिया, वाहतूक कंत्राटदार राजू पारसेवार आणि ललित खुराणा यांच्यासह १९ जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला होता. पुढे हा तपास सीआयडीकडे देण्यात आला. त्यात बाहेतीसह १९ जणांविरुद्ध आरोपपत्र दाखल करण्यात आले आहे.
गुरुवारी ईडीने बाहेतीविरुद्ध गुन्हा नोंदवत त्याला अटक केली. या घोटाळ्यात फूड कॉर्पोरेशन ऑफ इंडियाची २८ गोडावून आणि तीन हजार रेशन दुकानांचा सहभाग आहे. तसेच अनोळखी सरकारी कर्मचारी, अधिकाऱ्यांसह दलाल, व्यावसायिकांचाही यात सहभाग असल्याचा संशय असल्याची माहिती ईडीकड़ून देण्यात आली. त्यानुसार अधिक तपास सुरू असल्याचेही ईडीने नमूद केले.
......................