मुंबई : ग्रामपंचायत निवडणूक निकालानंतर अहमदनगर, धुळे, पुणे जिल्ह्यांतील काही गावांमध्ये हाणामारीचे प्रकार घडले. काही ठिकाणी दगडफेक, शिवीगाळ होण्याचे प्रकारही झाले. या प्रकरणी गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.नगर जिल्ह्यातील ११ गावांमध्ये गोंधळ झाला. विजयी उमेदावारांच्या जल्लोषाने पराभूत उमेदवारांचे समर्थक चिडले. यातून मारहाण, शिवीगाळ, दमदाटी, धमकी देण्याचे प्रकार घडले. त्यामुळे पारनेर, श्रीगोंदा, श्रीरामपूर, संगमनेर पोलीस ठाण्यांमध्ये ५८ जणांविरुद्ध गुन्हे दाखल झाले आहेत.धुळ्यातील ६२ ग्रामपंचायतींच्या निवडणुकीचे निकाल जाहीर झाल्यानंतर लळींग, नेर व मोरशेवडी येथे विजयी उमेदवार व पराभूत उमेदवारांच्या गटांमध्ये हाणामारी झाली. याप्रकरणी लळींग येथे १३ जणांवर, नेर येथे पाच जणांवर गुन्हे दाखल करण्यात आले. मोरशेवडी येथेही शुक्रवारी सकाळी दोन गटांत हाणामारी झाली. पोलिसांनी सौम्य लाठीमार करून जमाव पांगविला. यासंदर्भात गुन्हा दाखल झालेला नाही. हाणामारीत चार जण जखमी झाले आहेत. पुणे जिल्ह्णातील मंचर ग्रामपंचायत निवडणुकीत पराभूत उमेदवाराच्या घरासमोर फटाके वाजविल्याने झालेल्या बाचाबाचीचे पर्यावसन दंगलीत झाले. त्यामुळे भेकेमळा (मंचर) येथे रात्री धुमश्चक्री उडून सूर्यकांत थोरात यांच्या घरावर हल्ला करण्यात आला. तसेच इतर दोघांना मारहाण करण्यात आली. याप्रकरणी २२ जणांविरोधात मंचर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला असून ७ जणांना अटक करण्यात आली आहे.तसेच नंदुरबारमधील सारंगखेडा ग्रामपंचायत निवडणुकीचा निकाल जाहीर झाल्यानंतर गुरुवारी दोन गटांत झालेल्या मारहाणीत दोन जण जखमी झाले आहेत. पोलिसांत परस्परविरोधी गुन्हे दाखल झाले आहेत.
ग्रामपंचायत निवडणूक निकालानंतर हाणामारी
By admin | Published: August 08, 2015 1:28 AM