ग्रामपंचायतीचे पासबुक, इतिवृत्त वहीच पळवली

By admin | Published: May 22, 2014 04:38 AM2014-05-22T04:38:29+5:302014-05-22T04:38:29+5:30

अलिबाग तालुक्यातील वैजाळी-हाशिवरे गावात शासनाच्या सहकार व पणन विभागामार्फत एमएसीपी प्रकल्प राबविण्यात येतो

The Gram Panchayat passbook, the same story ran away | ग्रामपंचायतीचे पासबुक, इतिवृत्त वहीच पळवली

ग्रामपंचायतीचे पासबुक, इतिवृत्त वहीच पळवली

Next

अलिबाग : अलिबाग तालुक्यातील वैजाळी-हाशिवरे गावात शासनाच्या सहकार व पणन विभागामार्फत एमएसीपी प्रकल्प राबविण्यात येतो. या प्रकल्पांतर्गत आठवडी बाजार सुविधा कार्यक्रमासाठी २५ लाखांचा निधी मिळविण्यासाठी १० टक्के लोकवर्गणी भरण्यासाठी आयोजित करण्यात आलेल्या मासिक सभेत, शेकापचे ग्रामपंचायत सदस्य नंदकुमार प्रभाकर पाटील व ग्रामपंचायत सदस्या अरूणा सिध्दनाथ पाटील यांनी चक्क ग्रामपंचायतीचे बँकेचे पासबुक व इतिवृत्त वहीच पळवून नेल्याची घटना घडली. यासंदर्भात वैजाळी ग्रामपंचायतीचे सरपंच विद्याधर अनंत ठाकूर यांनी पोयनाड पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. शासनाच्या सहकार व पणन विभागामार्फत एमएसीपी प्रकल्प अंतर्गत आठवडी बाजार सुविधा कार्यक्रम, गावात आठवडी बाजारतळ व इतर मूलभूत सुविधा मिळणार असल्याचे पत्र ग्रामपंचायतीस नुकतेच प्राप्त झाले होते, अशी माहिती सरपंच विद्याधर ठाकूर यांनी यावेळी दिली. जागतिक बँक अर्थसहाय्य, महाराष्ट्र स्पर्धात्मक कृषी विकास प्रकल्प शेतीची पारदर्शकता वाढविणे, शेतकर्‍यांची क्षमता वृद्धी करणे, या हेतूने शासन हे अनुदान देणार होते. राज्यात अनेक ठिकाणी आठवडी बाजार भरतो. परंतु, बर्‍याच ठिकाणी मूलभूत सुविधांचा अभाव असल्याने शेतकरी व व्यापारी यांची गैरसोय होते. ही बाब लक्षात घेऊन आठवडी बाजार विकास कार्यक्रम राबवण्यास सुरुवात झाली. दरवर्षी ग्रामपंचायतींना ज्यांची लोकसंख्या ७५०० पेक्षा अधिक आहे, अशा गावांना या योजनेचा लाभ घेता येतो. या योजनेअंतर्गत ग्रामपंचायतीने १० टक्के व शासनाकडून ९०टक्के रक्कम खर्च करून बाजारतळ ठिकाणी विक्रेत्यांना ओटे, शेड, अंतर्गत रस्ते, पाणीपुरवठा स्वच्छतागृह, वीजपुरवठा, कुंपण, घनकचरा व्यवस्थापन अशा सुविधा उपलब्ध करावयाच्या आहेत. त्याप्रमाणे वैजाळी ग्रामपंचायतीला २५ लाखांचा निधी मिळणार असल्याने या रकमेच्या १० टक्के म्हणजे २ लाख पन्नास हजार लोकवर्गणी म्हणून शासनाकडे जमा करावयाचे असल्याने २० मे रोजी मासिक सभा आयोजित करण्यात आली होती. परंतु या सभेमध्ये शेकापचे ग्रामपंचायत सदस्य नंदकुमार प्रभाकर पाटील व ग्रामपंचायत सदस्या अरूणा सिध्दनाथ पाटील यांनी ग्रामसेवक भोईर यांच्यासमवेत अर्वाच्च भाषेत वाद घालून ग्रामपंचायतीचे बँकेचे पासबुक व इतिवृत्त वही त्यांच्याकडून हिसकावून घेतले व पळून गेले. याची तक्रार सरपंच ठाकूर यांनी पोयनाड पोलीस ठाण्यात दाखल केली आहे. अलिबाग तालुक्यातील मोठया गावात हाशिवरे गावाची गणती होते. या ठिकाणच्या आठवडे बाजारात मोठया प्रमाणात खरेदी, विक्री होते. यामुळे ग्रामपंचायतचे उत्पन्न वाढण्यास मदत होईल, असा आमचा विश्वास होता पण काही लोकांना प्रत्येक गोष्टीत राजकारण आणायची सवय असल्याचे यावेळी सरपंच ठाकूर यांनी अखेरीस सांगितले. (विशेष प्रतिनिधी)

Web Title: The Gram Panchayat passbook, the same story ran away

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.