ठाणे : वर्षभराच्या आत डम्पींग ग्राऊंड हटविले जाईल असे आश्वासन महापालिका आयुक्त असीम गुप्ता यांनी दिले असले तरी, आता एक वर्ष वाट पाहू शकत नसल्याचे सांगून हे डम्पींग ग्राऊंड तत्काळ हटवावे अन्यथा पालिकेच्या गाड्या रोखल्या जातील, असा इशारा दिव्यातील ग्रामस्थांनी दिला आहे. यानुसार येत्या बुधवारी हे आंदोलन छेडले जाणार असून, सुरूवातीला शांततेचा मार्ग अवलंबला जाणार आहे. त्यातूनही प्रशासनाला जाग आली नाही तर पालिकेचे डम्पर फोडले जातील, गाड्या रोखल्या जातील असा इशारा त्यांनी दिला आहे. काही दिवसापासून दिव्यातील डम्पींग ग्राऊंडचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. उपमहापौरांनी काही दिवसांपूर्वी डम्पींगला भेट देऊन यावर तोडगा काढण्याचे आश्वासन दिले होते. त्यानंतर दोनच दिवसापूर्वी आयुक्तांनी दिव्यातील गावकऱ्यांच्या समस्या जाणून घेण्याचा प्रयत्न केला. तसेच येथून जमा होणाऱ्या कराद्वारे दिव्याचा विकास केला जाईल, असे आश्वासनही दिले होते. शिवाय वर्षभराच्या आत डम्पींगचा प्रश्न सोडविला जाईल असेही म्हटले होते. कित्येक वर्षापासून अशा प्रकारची केवळ पोकळ आश्वासनेच पालिका आणि राजकर्ते देत असल्याची भूमिका येथील ग्रामस्थांनी व्यक्त केली. त्यामुळे आता दिव्यातून कायमचे डम्पींग हटविण्यासाठी बुधवारी सकाळी १० वाजता या आंदोलन होणार असल्याचे येथील ग्रामस्थ निलेश पाटील यांनी सांगितले. (वार्ताहर)
डम्पिंग ग्राउंडविरोधात ग्रामस्थ एकवटले
By admin | Published: November 17, 2014 11:05 PM