पंचायत पुरस्काराने ग्रामविकास विभागाचा गौरव
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 25, 2018 01:38 AM2018-04-25T01:38:49+5:302018-04-25T01:38:49+5:30
पंतप्रधानांच्या हस्ते सत्कार : पंकजा मुंडे यांनी स्वीकारला पुरस्कार
मुंबई: राज्यातील ग्रामपंचायतींना सशक्त करण्यासाठी आधुनिक तंत्रज्ञानाचा उत्कृष्ट वापर केल्याबद्दल महाराष्ट्राच्या ग्रामविकास विभागाला राष्ट्रीय ई-पंचायत पुरस्काराने गौरविण्यात आले. मंडला (जबलपूर, मध्य प्रदेश) येथे झालेल्या कार्यक्रमात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे यांनी हा पुरस्कार स्वीकारला.
राष्ट्रीय पंचायत राज दिनानिमित्त मंडला येथे या पुरस्काराचे वितरण करण्यात आले. यावेळी मध्य प्रदेशच्या राज्यपाल आनंदीबेन, मुख्यमंत्री शिवराजसिंह चौहान, केंद्रीय ग्रामविकास मंत्री नरेंद्रसिंह तोमर, राज्यमंत्री रूपाला आदी उपस्थित होते.
केंद्र सरकारच्या विविध योजना ग्रामीण लोकांपर्यंत यशस्वीपणे पोहोचविण्यासाठी आधुनिक तंत्रज्ञानाचा उत्कृष्ट वापर केल्याबद्दल कांही राज्यांचा यावेळी गौरव करण्यात आला. प्रथम पुरस्कार सिक्कीम राज्याला, दुसरा ओरिसाला तर तृतीय पुरस्कार महाराष्ट्राला मिळाला. शासनाच्या विविध योजना ग्रामीण लोकांपर्यंत यशस्वीपणे पोहोचविण्यासाठी आधुनिक तंत्रज्ञानाचा उत्कृष्टरित्या वापर केल्याबद्दल पंतप्रधान मोदी यांनी पंकजा मुंडे यांचे यावेळी आपल्या भाषणात खास कौतुक केले.