मुंबईची ग्रामदेवता, तारणहार ‘मुंबादेवी’
By Admin | Published: October 1, 2014 01:20 AM2014-10-01T01:20:57+5:302014-10-01T01:20:57+5:30
मुंबईत ‘मुंबादेवी’ला अनन्यसाधारण महत्त्व आहे. मुंबादेवी मुंबईची ग्रामदेवता म्हणून ओळखली जाते.
>मुंबई : मुंबईत ‘मुंबादेवी’ला अनन्यसाधारण महत्त्व आहे. मुंबादेवी मुंबईची ग्रामदेवता म्हणून ओळखली जाते. मुंबईकरांवर कोसळलेले संकट तारण्याचे काम ही देवीच करीत असल्यामुळे मुंबईला एवढय़ा वर्षात एकदाही वादळाचा तडाखा बसलेला नाही, अशी श्रद्धा आहे. काळबादेवी परिसरातील चिंचोळ्या गल्लीत ही देवी विराजमान आहे.
मुंबईत आठव्या शतकापासून बाराव्या शतकार्पयत शिलाहारांचे राज्य होते. ग्रामदेवता असलेल्या या देवीचे स्थानही त्या वेळी बोरीबंदर परिसरातल्या प्राचीन मंदिरात होते. 1737 साली ब्रिटिशांनी मुंबईभोवती असलेल्या किल्ल्याचा विस्तार करण्याचे ठरवले. त्यामुळे देवीचे मूळ स्थानही हलवण्यात येऊन ती काळबादेवी परिसरात आली. मात्र काळबादेवीला असलेले मुंबादेवीचे मंदिर हे 1753 साली पांडुशेठ सोनार या देवीभक्ताने बांधले. त्यानंतर काही वर्षे मंदिराचा कारभार सोनार कुटुंबीय पाहत होते. मात्र हायकोर्टाच्या आदेशानंतर गेल्या 2क् वर्षापासून मंदिराचा ट्रस्ट कारभार पाहत आहे.
या देवीच्या नावाबद्दल मात्र अनेक दंतकथा आहेत. पुराणात मुंबई परिसरात दहशत माजवणा:या मुबारक राक्षसाचा देवीने वध केला म्हणून तिचे नाव ‘मुंबादेवी’ पडले असावे असे मानले जाते. तर चौदाव्या शतकाचाही उल्लेख आढळतो. त्या वेळी मुबारक शहा या मुस्लीम सरदाराच्या ताब्यात मुंबईचा परिसर होता. त्याचे अत्याचार प्रचंड होते. मात्र देवीमुळे त्याचे अत्याचार थांबल्याने तिला ‘मुंबादेवी’ म्हटले गेले. तर आणखी एक कथा ही कोळी बांधवांशी जोडली गेली आहे. पूर्वी कोळी-आगरी समाज मुंबईत मोठय़ा प्रमाणात राहत असे. या कोळी समाजातल्या मुंगा किंवा मोंगू नावाच्या कोळीणीने देवीची स्थापना केली आणि तिच्या नावाने ही देवी मुंगादेवी म्हणून ओळखली जाऊ लागली.
पुढे काळानुरूप मुंगाची ‘मुंबादेवी’ झाली. (प्रतिनिधी)