Join us

लोकसभेच्या ४८ जागांवर महायुतीचे उमेदवार निवडून आणण्याचा ठराव; एकनाथ शिंदेंची माहिती

By ऑनलाइन लोकमत | Published: September 01, 2023 2:42 PM

राष्ट्रीय लोकशाही आघाडीची बैठक संपन्न

मुंबई: राष्ट्रीय लोकशाही आघाडीची बैठक संपन्न झाली. या बैठकीला उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासह महायुतीतील शिवसेना, भारतीय जनता पार्टी, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी आणि मित्रपक्षांचे सर्व प्रमुख नेते उपस्थित होते. या बैठकीत आगामी लोकसभा निवडणुकीला एकत्रितपणे सामोरे जाऊन राज्यातील सर्वच्या सर्व ४८ जागांवर महायुतीचे उमेदवार निवडून आणण्याचा ठराव संमत करण्यात आला. 

चंद्रयान-३ च्या यशस्वी मोहिमेबद्दल इस्रोतील सर्व शास्त्रज्ञांच्या अभिनंदनाचा ठरावही राष्ट्रीय लोकशाही आघाडीच्या बैठकीत मंजूर करण्यात आला. तसेच गेली ९ वर्षे देशाची अविरत सेवा करून देशात सुशासन आणि भ्रष्टाचारमुक्त वातावरण निर्माण केल्याबद्दल, तसेच देशाचे नाव आंतरराष्ट्रीय पातळीवर वेगळ्या उंचीवर नेऊन ठेवल्याबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे अभिनंदन करणारा प्रस्ताव बहुमताने मंजूर करण्यात आल्याची माहिती मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ट्विट करत दिली. 

राज्यात महायुती सरकारने केलेली विकासकामे आणि घेतलेले लोकाभिमुख निर्णय थेट लोकांपर्यंत पोहचवून पुन्हा एकदा केंद्रात राष्ट्रीय लोकशाही आघाडीची सत्ता आणण्याचा निर्धार या बैठकीत करण्यात आला. यावेळी शिवसेना नेते रामदास कदम, भारतीय जनता पक्षाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे आणि नेते प्रफुल्ल पटेल, रिपब्लिकन पक्षाचे नेते आणि केंद्रीय मंत्री रामदास आठवले, जनसुराज्य पक्षाचे विनय कोरे, प्रहार संघटनेचे बच्चू कडू,राष्ट्रीय समाज पक्षाचे महादेव जानकर, रयत क्रांती संघटनेचे अध्यक्ष सदाभाऊ खोत उपस्थित होते.

टॅग्स :एकनाथ शिंदेराष्ट्रीय लोकशाही आघाडीभाजपानिवडणूक