Join us  

विधान परिषदेच्या १२ जागांसाठी महायुतीचा ६-३-३ चा फॉर्म्युला; भाजपकडून 'या' नेत्यांची नावे चर्चेत!

By यदू जोशी | Published: August 31, 2024 9:16 AM

शिंदे-फडणवीस-पवार यांच्यात चर्चा, वर्षावर रात्री खलबते होऊन झाले शिक्कामोर्तब, लवकरच यादी राज्यपालांकडे पाठविणार.

यदु जोशी, लोकमत न्यूज नेटवर्क |मुंबई: विधान परिषदेच्या १२ राज्यपाल नियुक्त जागा भरण्यासाठीच्या हालचालीला वेग आला आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार आणि ज्येष्ठ नेते खा. प्रफुल्ल पटेल यांच्यात याविषयी गुरुवारी रात्री खलबते झाली. 

खात्रीलायक सूत्रांनी ही माहिती दिली. या १२ मध्ये भाजपला सहा, शिंदे सेनेला तीन, तर अजित पवार गटाला तीन जागा मिळणार असल्याची माहिती आहे. तिन्ही पक्षांनी आपापली नावे अंतिम करण्याचा निर्णय वर्षा बंगल्यावरील या बैठकीत घेण्यात आला. राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत लवकरच या नावांना मान्यता देऊन राज्यपालांकडे ती मान्यतेसाठी पाठविली जातील, असे समजते. १२ जागांचे प्रकरण न्यायालयात आहे, पण त्यावर १ सप्टेंबर रोजी अंतिम निकाल येण्याची शक्यता आहे, हे लक्षात घेऊन आता हालचालींना वेग आला आहे. 

राज्यपाल नियुक्त आमदारांची नियुक्ती ३० ऑगस्टपूर्वी केली जाईल, असे उपमुख्यमंत्री पवार यांनी गेल्या महिन्यात पत्रकारांशी अनौपचारिक चर्चा करताना सांगितले होते. विधानसभा निवडणूक नोव्हेंबरमध्ये होण्याची शक्यता आहे. अशावेळी कोणत्याही परिस्थितीत या १२ जागा भरण्याचा महायुती सरकारचा प्रयत्न आहे. विधानसभा निवडणुकीत फायदा होईल, अशाच पद्धतीने ही १२ नावे निश्चित केली जातील, असे म्हटले जाते. 

महायुती होणार भक्कम१२ सदस्यांच्या नियुक्तीनंतर विधान परिषदेत महायुतीचे संख्याबळ वाढणार आहे. ७८ सदस्य असलेल्या या सभागृहात सध्या २७ जागा रिक्त आहेत. त्यात राज्यपाल नियुक्त आणि स्थानिक स्वराज्य संस्थामधून विधान परिषदेवर पाठवावयाच्या जागांचा समावेश आहे. महायुतीला  समर्थन देणाऱ्या अपक्षांसह सध्या महायुतीचे ३४ आमदार विधान परिषदेत आहेत. महाविकास आघाडीचे १७ आमदार आहेत. १२ सदस्यांच्या नियुक्तीनंतरही १५ जागा रिक्त असतील.

भाजपकडून या नावांची चर्चामाजी आमदार सुधाकर कोहळे, राष्ट्रीय सचिव विजया रहाटकर, महिला आघाडीच्या अध्यक्ष चित्रा वाघ, अध्यात्मिक आघाडीचे अतुल भोसले, नाशिकचे बाळासाहेब सानप. हर्षवर्धन पाटील.

बहुजन चेहऱ्याला मिळेल संधीलोकसभा निवडणुकीत ज्या कारणांनी महायुतीला फटका बसला, ती समोर ठेऊन ही १२ नावे ठरविली जाणार आहेत. त्यात मुख्यत्वे राज्याच्या विविध भागांतील जातीय समीकरणे समोर ठेवली जातील. बहुजन समाजाच्या चेहऱ्यांना भाजपकडून अधिक संधी दिली जाईल. 

टॅग्स :विधान परिषदमहाराष्ट्र सरकार