मनोहर कुंभेजकर
अंधेरी पश्चिम येथील आझादनगर सार्वजनिक उत्सव समिती आयोजित या गणेशोत्सव मंडळाचे यंदा ५८ वे वर्ष आहे. नवसाला पावणारा अंधेरीचा राजा अशी या गणपतीची ख्याती असून १९७४ पासून त्याचे दरवर्षी संकष्टीला विसर्जन होते. दरवर्षी आकर्षक देखावे साकार करणाऱ्या या समितीने यंदा येथे ४००० चौफूट जागेत हुबेहूब रायगड किल्ला साकारला आहे. अंधेरीच्या राजाची उद्या सोमवार दि,२ ऑक्टोबर रोजी सायंकाळी ६ वाजता येथील मंडपातून
भव्य विसर्जन मिरवणूक निघणार असून दुसऱ्या दिवशी १८ तासांच्या मिरवणूकीनंतर वेसावे सुमद्रात अंधेरीच्या राजाचे विसर्जन होणार असल्याची माहिती आझाद नगर सार्वजनिक गणेशोत्सव समितीचे प्रमुख मार्गदर्शक व पालिकेचे माजी सभागृह नेते यशोधर(शैलेश) फणसे व खजिनदार सुबोध चिटणीस यांनी दिली.
जागतिक दर्जाच्या शिक्षकांच्या देखरेखीखाली विभागातील लहान मुलांना प्रोत्साहन मिळण्यासाठी फुटबॉल अकॅडमीची स्थापना केली आहे.विभागात विविध क्रीडा स्पर्धा तसेच प्रिमियर लीगचे आयोजन करण्यात येते.
छत्रपती शिवाजी महाराज यांचा राज्याभिषेक ६ जून १६७४ साली झाला होता आणि त्यांनी येथून हिंदवी स्वराज्याची पायाभरणी केली होती. त्यांच्या राज्याभिषेक सोहळ्याला ३५० वर्षे पूर्ण झाल्याबद्दल यंदा येथे ४००० चौफूट जागेत हुबेहूब रायगड किल्ल्यात राजा विराजमान झाला आहे. प्रसिद्ध कला दिग्दर्शक धर्मेश शाह यांनी साकारला आहे. - अशोक राणे , अध्यक्ष
१९७४ पासून अंधेरीच्या राजाचे दरवर्षी संकष्टीला विसर्जन होते आणि या दिवशी राजाचे दर्शन घेतल्यावर भक्त संकष्टीचा उपवास सोडतात. मिरवणुकीत राजावर पुष्पवृष्टी करतात आणि ओवळून त्याचे स्वागत केले जाते. तर दिवाळीत फटाके विक्रीचा धंदा चांगला व्हावा यासाठी अंधेरी मार्केटचे अल्पसंख्याक बांधव अंधेरीच्या राजाचे स्वागत करतात. - सुबोध चिटणीस , खजिनदार
महिला कार्यकर्त्यांनी येथे अथर्वशीर्षाचे पठण, तसेच भजन आयोजित केले होते. समितीतर्फे नवरात्र उत्सव,नवचंडी हवन आणि दिवाळी पहाटचे आयोजन केले जाते, तसेच येथील सुरक्षा व्यवस्थापन चोख असून समितीचे पुरुष व महिला कार्यकर्ते २४ तास जागता पहारा देत आळीपाळीने सुरक्षा व्यवस्थापन संभाळतात. - विजय सावंत, सचिव
सामाजिक, शैक्षणिक व सांस्कृतिक उपक्रम राबविले आहेत. महिला येथील विविध उपक्रमात नेहमी अग्रेसर असतात. नानावटी हॉस्पिटलमध्ये आमच्या समितीतर्फे गरजूंसाठी एका बेडची नि:शुल्क व्यवस्था केली आहे. सुसज्ज व्यायामशाळा आहे. फुटबॉल अकॅडमीची स्थापना केली आहे. - महेंद्र धाडिया , कार्याध्यक्ष
नवसाला पावणारा म्हणून ख्याती असणाऱ्या या राजाची उद्या सोमवारी सायंकाळी ६ वाजता आझाद नगर २ मधील राजाच्या मंडपातून भक्तांच्या उपस्थितीत भव्य मिरवणूक निघणार आहे. दुसऱ्या दिवशी वेसावे समुद्रकिनारी पोहाेचेल. यथासांग पूजा केल्यावर राजाचे विसर्जन होईल. - यशोधर(शैलेश) फणसे, प्रमुख मार्गदर्शक