ऑगस्ट क्रांती मैदानात उभारणार स्वातंत्र्यलढ्याचे भव्य स्मारक

By ऑनलाइन लोकमत | Published: March 13, 2021 01:49 AM2021-03-13T01:49:02+5:302021-03-13T01:49:33+5:30

मुख्यमंत्री; स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवी वर्षारंभानिमित्त कार्यक्रम

A grand monument to the freedom struggle will be erected at the August Revolution Ground | ऑगस्ट क्रांती मैदानात उभारणार स्वातंत्र्यलढ्याचे भव्य स्मारक

ऑगस्ट क्रांती मैदानात उभारणार स्वातंत्र्यलढ्याचे भव्य स्मारक

Next
ठळक मुद्देयावेळी स्वातंत्र्यसैनिक सत्यबोध नारायण सिंगीत, शहीद स्क्वाड्रन लीडर मनोहर राणे यांच्या वीर पत्नी माधुरी राणे, हवालदार मधुसूदन नारायण सुर्वे तसेच प्रधानमंत्री राष्ट्रीय बाल पुरस्कारप्राप्त काव्या कार्तिकेयन यांचा सत्कार करण्यात आला

लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : ऑगस्ट क्रांती मैदान हे एक रणमैदान होते. स्वातंत्र्य चळवळीची आठवण देणाऱ्या या मैदानाचे नुसते नूतनीकरण न करता या मैदानात स्वातंत्र्य लढा जिवंत करणारे स्मारक उभारण्यात येईल असे सूतोवाच मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी शुक्रवारी येथे केले. मुंबईतील आझाद क्रांती मैदानात आयोजित भारतीय स्वातंत्र्याच्या ७५ व्या वर्षानिमित्त ‘आजादी का अमृतमहोत्सव’ कार्यक्रमाचा शुभारंभ मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते झाले. अध्यक्षस्थानी मुंबई शहराचे पालकमंत्री अस्लम शेख होते, तर प्रमुख अतिथी म्हणून सांस्कृतिक कार्य मंत्री अमित देशमुख उपस्थित होते. महसूलमंत्री बाळासाहेब थोरात, विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर, खा. अरविंद सावंत, महापौर किशोरी पेडणेकर, आ. मंगलप्रभात लोढा, मुख्य सचिव सीताराम कुंटे प्रामुख्याने उपस्थित होते.

यावेळी स्वातंत्र्यसैनिक सत्यबोध नारायण सिंगीत, शहीद स्क्वाड्रन लीडर मनोहर राणे यांच्या वीर पत्नी माधुरी राणे, हवालदार मधुसूदन नारायण सुर्वे तसेच प्रधानमंत्री राष्ट्रीय बाल पुरस्कारप्राप्त काव्या कार्तिकेयन यांचा सत्कार करण्यात आला. मुख्यमंत्री म्हणाले की, हुतात्म्यांचे फक्त स्मरण करून भागणार नाही, तर ज्यांनी आपले आयुष्य घालवले त्यांना अभिमान वाटेल असा देश उभा करता येईल का, स्वराज्याबरोबरच सुराज्य आणू शकतो का हा विचार व्हावा. मंत्री अमित देशमुख म्हणाले की, स्वातंत्र्याचा अमृतमहोत्सव राज्यात दिमाखदारपणे साजरे करण्यात येईल. यावेळी सांस्कृतिक कार्य विभागाचे सचिव सौरभ विजय, माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाचे सचिव तथा महासंचालक दिलीप पांढरपट्टे, जिल्हाधिकारी राजीव निवतकर, सांस्कृतिक कार्य संचालक बिभीषण चवरे आदी उपस्थित होते. स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवानिमित्त राज्यात दर आठवड्याला एक कार्यक्रम होणार आहे. आझाद क्रांती मैदान; मुंबई, पुण्यात आगाखान पॅलेस आणि वर्धेच्या सेवाग्राम आश्रमात विशेष कार्यक्रम होतील, अशी माहिती यावेळी देण्यात आली.

Web Title: A grand monument to the freedom struggle will be erected at the August Revolution Ground

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.