लोकमत न्यूज नेटवर्कमुंबई : दर्जेदार आशियाई चित्रपटांचा नजराणा घेऊन आलेल्या ‘थर्ड आय फिल्म फेस्टिव्हल’चे सोमवारी झोकात उद्घाटन झाले. यावेळी ज्येष्ठ अभिनेत्री आशा पारेख यांचा सन्मान करण्यात आला, तर समाजमनात सिनेसंस्कृती रुजविण्याचे कार्य करणारे व सिनेमाचा प्रचार करणारे ज्येष्ठ सिने अभ्यासक सुधीर नांदगावकर यांना सत्यजित रे मेमोरियल पुरस्कार प्रदान करण्यात आले. प्रकृती ठीक नसल्याने ते उपस्थित राहू शकले नाहीत.
एशियन फिल्म फाऊंडेशनतर्फे आयोजित करण्यात आलेल्या थर्ड आय आशियाई महोत्सवाची सुरुवात दीपप्रज्वलन करून झाली. त्यानंतर ज्येष्ठ अभिनेत्री आशा पारेख यांचा शाल, पुष्पगुच्छ आणि सन्मानचिन्ह देऊन सन्मान करण्यात आला. यावेळी मनोगत व्यक्त करताना आशा पारेख म्हणाल्या, थर्ड आय फिल्म फेस्टिव्हल आणखी ५० वर्षांपेक्षाही अधिक काळ सुरू राहो. कारण हा महोत्सव चित्रपटांसोबत लघुपट आणि माहितीपटांनाही सामावून घेतो. थिएटरमध्ये जे चित्रपट पाहायला मिळत नाहीत ते इथे पाहण्याची संधी मिळते. उद्घाटनप्रसंगी महोत्सवाचे संचालक किरण शांताराम, ज्येष्ठ अभिनेते डॉ. मोहन आगाशे, सांस्कृतिक कार्य संचालक बिभीषण चवरे, महोत्सवाचे उप संचालक संदीप मांजरेकर आणि प्रोग्राम असिस्टंट संतोष पाठारे उपस्थित होते.
थर्ड आय फिल्म फेस्टिव्हलला मिळणारा निधी पुरेसा नसून महाराष्ट्र सरकारने वाढवून द्यावा, अशी विनंती किरण शांताराम यावेळी बोलताना व्यक्त केली. त्यावर पुढल्या वर्षी नक्कीच याची दखल घेतली जाईल आणि तक्रार करण्यास वाव मिळणार नसल्याची ग्वाही चवरे यांनी दिली. हा महोत्सव आशियातील सर्वांत महत्त्वाचा असून, फिल्म पाहायला आणि ऐकायला शिकविणारा असल्याचे मोहन आगाशे म्हणाले.
चित्रपट रसिकांना मेजवानीओढ या लघुपटाने महोत्सवाची सुरुवात करण्यात आली. त्यानंतर सरथ कोथालावाल आणि कुमारा थिरीमदुरा दिग्दर्शित ‘’द न्यूजपेपर’’ हा श्रीलंकन सिनेमा दाखविण्यात आला. १२ ते १८ डिसेंबर दरम्यान पु. ल. देशपांडे महाराष्ट्र कला अकादमीमध्ये हा महोत्सव सुरू राहणार आहे. महोत्सवाची सांगता अनिक दत्ता दिग्दर्शित ‘अपराजितो’ने होणार आहे.