Join us

मुंबई महापालिकेत लिपिकांची महाभरती, आजपासून अर्ज करण्यास सुरुवात

By ऑनलाइन लोकमत | Published: August 20, 2024 7:57 AM

पालिकेच्या वेबसाइटवर या भरतीबाबत सविस्तर जाहिरात देण्यात आली आहे. दरम्यान, पाणी पुरवठा विभागातील अनेक पदे रिक्त आहेत. त्यामुळे त्या विभागावरही कामाचा ताण आहे. 

मुंबई : मुंबई महापालिकेत नोकरी मिळावी, यासाठी प्रयत्नशील असलेल्या हजारो उमेदवारांसाठी खुशखबर आहे. लिपिक पदाच्या एक हजार ८४६ जागा सरळ सेवेने भरण्यात येणार आहेत. त्यासाठी २० ऑगस्टपासून ऑनलाइन अर्ज मागविण्यात येत असून, ९ सप्टेंबरला रात्री ११.५९ वाजेपर्यंत अर्ज करता येतील. पालिकेच्या वेबसाइटवर या भरतीबाबत सविस्तर जाहिरात देण्यात आली आहे. दरम्यान, पाणी पुरवठा विभागातील अनेक पदे रिक्त आहेत. त्यामुळे त्या विभागावरही कामाचा ताण आहे. 

आयुक्त तथा प्रशासक भूषण गगराणी यांच्या निर्देशानुसार, महापालिकेच्या अतिरिक्त आयुक्त (शहर) डॉ. अश्विनी जोशी यांच्या मार्गदर्शनाखाली भरतीची प्रक्रिया राबविण्यात येत आहे. पालिकेतील विविध खात्यांच्या आस्थापनेवरील गट ‘क’मधील रुपये २५,५००-८१,१०० (पे मॅट्रिक्स-एम १५) अधिक भत्ते या सुधारित वेतनश्रेणीतील ही पदे भरण्यात येणार आहेत.   

आरक्षित प्रवर्गांनुसार जागाअनुसूचित जाती (१४२), अनुसूचित जमाती (१५०), विमुक्त जाती-अ (४९), भटक्या जमाती-ब (५४), भटक्या जमाती-क (३९), भटक्या जमाती-ड (३८), विशेष मागास प्रवर्ग (४६), इतर मागासवर्ग (४५२), आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक (१८५), सामाजिक व शैक्षणिकदृष्ट्या मागासवर्ग (१८५), खुला प्रवर्ग (५०६) याप्रमाणे रिक्त पदांसाठी भरती प्रक्रिया राबविली जाईल. तसेच या पदांचे समांतर आरक्षणानुसार वर्गीकरण करण्यात आले असून त्याची सविस्तर माहिती जाहिरातीमध्ये दिली आहे.

टॅग्स :मुंबई महानगरपालिका