गिरगावात शोभायात्रेत यंदा ‘शिवराज्य हेच रामराज्य’; २२ फूट उंच रामभक्त हनुमंताच्या हातात यात्रेची मुख्य गुढी
By स्नेहा मोरे | Published: April 5, 2024 08:00 PM2024-04-05T20:00:59+5:302024-04-05T20:01:15+5:30
स्वामी विवेकानंद युवा प्रतिष्ठानचा भगवान रामलल्लाचे दर्शन देणारा, तसेच छत्रपती शिवरायांच्या राज्यकारभाराचे पुण्यस्मरण करणारा शिवराज्य हेच रामराज्य या संकल्पनेवरील चित्रस्थ यात्रेचे आकर्षण असेल.
मुंबई - दरवर्षीप्रमाणे गुढीपाडव्याच्या दिवशी (९ एप्रिल रोजी) गिरगावातील फडके मंदिरापासून हिंदू नववर्ष स्वागत यात्रा, गिरगावचा पाडवा साजरा करण्यात येणार आहे. स्वामी विवेकानंद युवा प्रतिष्ठान आयोजित यात्रेचे हे २२ वे वर्ष आहे. श्रीमंत योगी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या राज्याभिषेकाच्या ३५० व्या वर्षी अयोध्येतील मंदिरात रामलल्लाची प्राणप्रतिष्ठा यानिमित्ताने ‘शिवराज्य हेच रामराज्य’ ही यंदाच्या यात्रेची संकल्पना आहे.
यात्रेचा प्रारंभ ९ एप्रिल रोजी सकाळी ८ वाजता गिरगावातील फडके श्रीगणपती मंदिरापासून गुढी पूजनाने होईल. मूर्तिकार गीतेश पवार आणि गौरव पवार यांनी साकारलेल्या २२ फूट उंच रामभक्त हनुमंताच्या हातात यात्रेची मुख्य गुढी असेल. पर्यावरण रक्षणाचा विचार करून ही प्रतिकृती यंदाही कागदाचा वापर करून बनवण्यात येणार आहे. कापरेश्वरवाडी मंडळातर्फे शिवाजी महाराजांनी करवून घेतलेला नेताजी पालकर यांचा हिंदू धर्म प्रवेश, रावणाच्या दरबारात स्वतःच्या शेपटीवर आसनस्थ हनुमान, शबरी माता श्रीराम भेट असा देखावा, शेणवीवाडी मंडळातर्फे शिवरायांची स्वराज्य शपथ यावरील लहान मुलांचा सहभाग असलेला देखावा, मंदार आर्टस् चिराबाजार यांचा शिवरायांच्या स्वप्नातील अयोध्या मथुरा-काशी मंदिर मुक्ती संबंधित देखावा, सह्याद्री प्रतिष्ठान यांचा दुर्ग संवर्धनावरील चित्ररथ, स्वामी समर्थ भक्त परिवार यांचा पालस्ती सोहळा, तसेच गिरगावातील गणेशोत्सव आणि नवरात्रोत्सव मंडळ यांचा सहभाग नववर्ष स्वागत यात्रेत असणार आहे.
शोभायात्रेची वैशिष्ट्ये
मूर्तिकार प्रदीप मादुस्करांनी साकारलेला वैभवसंपन्न गणेश यात्रेच्या अग्रस्थानी असेल. स्वामी विवेकानंद युवा प्रतिष्ठानचा भगवान रामलल्लाचे दर्शन देणारा, तसेच छत्रपती शिवरायांच्या राज्यकारभाराचे पुण्यस्मरण करणारा शिवराज्य हेच रामराज्य या संकल्पनेवरील चित्रस्थ यात्रेचे आकर्षण असेल. लालबागच्या राजाचे मूर्तिकार संतोष कांबळी यांचा शिवछत्रपतींच्या राज्याभिषेकाचा भव्य देखावा आणि प्रसिद्ध कलादिग्दर्शक तुषार कोळी यांचा छत्रपती शिवरायांवरील जीवंत देखावा यात्रेची शोभा वाढवणार आहेत. पारंपरिक वेशातील दुचाकीस्वार युवतीचे आदिशक्ती पथक, युवकांचे युवाशक्ती पथक, गिरगाव कलामंचतर्फे संस्कारभारती रांगोळ्या, तसेच रंगशारदातर्फे यात्रा मार्गावर रांगोळ्यांच्या पायघड्या ही प्रतिवर्षाप्रमाणे यात्रेची वैशिष्ट्ये असणार आहेत.
पपनसवाडी मंडळाची पर्यावरणस्नेही १६ फुटी रामावतारातील गणेश मूर्ती, नितेश मिस्त्री यांनी साकारलेला १ इंचाचा गणपती आणि अन्य शहर उपनगरांतील मंडळ-संस्थांचा सहभाग यावर्षी यात्रेत असणार आहे. गुढीपाडव्याच्या आदल्या दिवशी फाल्गुन अमावास्येला धर्मवीर संभाजी महाराजांच्या पुण्यतिथी निमित्ताने गिरगावातील विविध चौकांत छत्रपती संभाजी महाराजांच्या बलिदानाचे स्मरण करण्यात येणार आहे. यात्रेचा समारोप श्यामलदास गांधी मार्ग येथे श्री सिद्धिविनायक दर्शन सोहळा व महाआरतीने होईल. - अन्वय पिटकर, अध्यक्ष, स्वामी विवेकानंद युवा प्रतिष्ठान