पालिकेच्या तोतया कर्मचाऱ्यांविरुद्ध गुन्हा, शिवड़ीतील घटना
सोन्याचे दागिने घालण्यास बंदी असल्याचे सांगून आजोबांची फसवणूक
पालिकेच्या तोतया कर्मचाऱ्यांविरुद्ध गुन्हा, शिवडीतील घटना
लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : पोलीस अथवा ओळखीची व्यक्ती असल्याची बतावणी करीत फसवणुकीच्या घटना समोर येत असताना, ठगांनी पालिका कर्मचारी असल्याचे सांगून फसवणुकीस सुरुवात केली आहे. सुरुवातीला कोरोना चाचणी केली का? म्हणत फसवणुकीचा प्रयत्न केला. मात्र चाचणी केली असल्याचे समजताच, कोरोनामुळे पालिकेने दोन दिवस सोन्याचे दागिने घालू नये, असे आदेश काढल्याचे सांगत, शिवडीत ७५ वर्षीय आजोबांची फसवणूक केली आहे. यात त्यांची दीड तोळ्याची सोनसाखळी घेऊन ठग पसार झाले आहेत.
या प्रकरणी आरएके मार्ग पोलीस ठाण्यात दोन अनोळखी ठगांविरुद्ध मंगळवारी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. शिवडी परिसरात ७५ वर्षीय तक्रारदार कुटुंबीयांसोबत राहण्यास आहेत. ते वकिली व्यवसायातून निवृत्त झाले आहेत. शनिवारी सकाळी बाजारात जाण्यासाठी निघाले. तेव्हा गांधीनगर परिसरात रस्त्याकडेला बसलेल्या दुकलीने त्यांना बोलावले. तेथे जाताच कोरोना चाचणी केली का? याबाबत विचारणा केली आणि स्वतः पालिकेचे कर्मचारी असल्याचे सांगितले. पुढे पालिकेने दोन दिवस सोन्याचे दागिने घालू नये असे आदेश दिल्याचे सांगून, गळ्यातील चेन काढण्याचा सल्ला दिला. त्यांनी गळ्यातील चेन काढताच ठगांनी ती कागदात बांधून देण्याचा बहाणा करीत, चेन घेऊन निघून गेले. पुढे खिशातील पुडी उघडताच त्यात चेनऐवजी दगड मिळून आले. यात फसवणूक झाल्याने त्यांनी पोलिसांत धाव घेतली. त्यानुसार पोलीस अधिक तपास करीत आहेत.