आजोबांनी केले चोराशी दोन हात
By ऑनलाइन लोकमत | Published: January 7, 2020 12:50 AM2020-01-07T00:50:55+5:302020-01-07T00:51:03+5:30
नॅशनल पार्कमध्ये ‘मॉर्निंग वॉक’साठी गेलेल्या एका आजोबांची सोनसाखळी चोरण्याचा प्रयत्न चोराने केला.
मुंबई : नॅशनल पार्कमध्ये ‘मॉर्निंग वॉक’साठी गेलेल्या एका आजोबांची सोनसाखळी चोरण्याचा प्रयत्न चोराने केला. मात्र या प्रकाराने घाबरून न जाता त्याच्याशी दोन हात करत आजोबांनी त्याला पळवून लावले. यात ते किरकोळ जखमी झाले असून, कस्तुरबा पोलिसांनी अनोळखी व्यक्तीविरोधात गुन्हा दाखल केला आहे.
तुकाराम पाटील (६९) हे बोरीवली नॅशनल पार्क परिसरात रोज पहाटे साडेपाचच्या सुमारास ‘मॉर्निंग वॉक’साठी जातात. सोमवारीदेखील ते साडेपाच वाजता बाहेर पडले. त्यावेळी बाहेर अंधार होता. त्यामुळे हातात बॅटरी घेऊन ते चालू लागले. जांभी टेकडी परिसरात त्यांना एका अनोळखी व्यक्तीने वेळ विचारली. तेव्हा हातातील बॅटरीचा झोत घड्याळावर मारत त्यांनी वेळ त्याला सांगितला. त्यानंतर ‘आज खूप थंडी आहे ना’ असे म्हणत त्याने चालण्याचा वेग मंदावत तो थोडा मागेच राहिला.
मात्र पाटील चालत पुढे निघून गेले. काही वेळानंतर त्याने बेसावध असलेल्या पाटील यांच्या मागून येत त्यांच्या मानेत हात घातला आणि गळ्यातील सोनसाखळी हिसकावण्याचा प्रयत्न केला. अचानक घडलेल्या या प्रकारामुळे पाटील थोडे गोंधळले, मात्र घाबरले नाहीत. त्यांनी त्या इसमाचा हात धरून त्याला खाली पाडला. त्यावेळी त्यांच्यात झटापट सुरू झाली. तो सोनसाखळी चोर आहे हे त्यांच्या लक्षात आले होते. त्यामुळे त्यांनी त्याला पकडण्याचा प्रयत्न केला. आता आपली काही खैर नाही हे लक्षात आल्यावर त्याच्याजवळ असलेल्या धारदार चाकूने त्याने पाटील यांच्यावर वार केला.
त्यामुळे त्यांची पकड थोडी सैल झाली, याचा फायदा घेत तो इसम फरार झाला. मात्र पाटील यांच्या खांद्याला दुखापत झाली. त्यांचा आवाज ऐकून आजूबाजूला वॉकसाठी आलेले लोक त्या ठिकाणी धावले आणि पाटील यांना स्थानिक रुग्णालयात उपचारांसाठी दाखल करण्यात आले.
याची माहिती कस्तुरबा पोलिसांना मिळताच त्यांनी घटनास्थळी धाव घेत अनोळखी व्यक्तीविरोधात गुन्हा दाखल केला आहे. मात्र या प्रकारामुळे पहाटेच्या वेळी बाहेर फिरण्यासाठी येणाऱ्या लोकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे.
>सीसीटीव्ही नसल्याचा फायदा !
ह्यआम्ही घटनास्थळी पाहणी केली मात्र त्याठिकाणी सीसीटीव्ही कॅमेरे नव्हते. तसेच अंधारामुळे जखमी व्यक्ती हल्लेखोराची ओळख नीट सांगू शकत नाही, याचाच फायदा चोराने घेतला असावा. आम्ही नॅशनल पार्कचे सर्व सीसीटीव्ही कॅमेरे पडताळून पाहत असुन हल्लेखोराचा शोध सुरू आहे.
- नामदेव शिंदे, वरिष्ठ पोलीस निरीक्षक, कस्तुरबा पोलीस ठाणे
>चेहरा नीट दिसला नाही
‘पहाटेच्या वेळी काळोख असल्याने मी हल्लेखोराचा चेहरा नीट पाहू शकलो नाही. मात्र तो माझ्याशी मराठीतून बोलत होता.
- तुकाराम पाटील, जखमी