Join us

Video: "आजोबा तेच, जाहिरात नवी"; 70 हजार कोटींच्या सिंचन घोटाळ्यावर यंदा मौन

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 27, 2024 19:44 IST

राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाने गत २०१४ च्या निवडणुकांवेळी भाजपाने केलेल्या जाहिरातींची आठवण करुन दिली आहे.

मुंबई - आगामी लोकसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर प्रचाराला सुरुवात झाली आहे. सर्वच राजकीय पक्षांनी निवडणुकांतील स्टार प्रचारकांच्या याद्याही जाहीर केल्या आहेत. दुसरीकडे निवडणूक कॅम्पेनही सुरू झालं असून जाहिरांतीवरही मोठ्या प्रमाणात खर्च करण्यात येत आहे. निवडणुकांची घोषणा होताच, भाजपाच्या जाहिरातींचे प्रसारण टीव्ही आणि सोशल मीडियातून दिसून येत आहे. भाजपाच्या निवडणूक कॅम्पेन जाहिराती नेहमीच चर्चेत असतात. काही दिवसांपूर्वीच रशिया-युक्रेन युद्धपरिस्थितीशी संबंधित एक जाहिरात सोशल मीडियावर चांगलीच व्हायरल झाली आहे. तर, २०१४ मधील भाजपाच्या जाहिरातीही लक्षवेधी होत्या. 

राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाने गत २०१४ च्या निवडणुकांवेळी भाजपाने केलेल्या जाहिरातींची आठवण करुन देत, भाजपा आणि अजित पवारांवर निशाणा साधला आहे. भाजपाने ७० हजार कोटींच्या सिंचनाचा उल्लेख करत जाहिरात केली होती. त्यामध्ये, एका आजोबांनी शेतकऱ्याची भूमिका साकारली होती. आता, त्याच आजोबाने सरकारच्या चांगल्या कामाची जाहिरात केली आहे. मिशन जल जीवनमुळे ग्रामीण भागात जीवनमान बदलल्याचं त्यांनी म्हटलं आहे. त्यावरुन, शरद पवार गटाने भाजपा आणि अजित पवारांना लक्ष्य केलं आहे.   

''आमच्या किसानाची जिंदगी बेक्कार झाली भाऊ, सरकारने म्हणे पाण्यासाठी ७० हजार कोटी खर्च केले. पण, आमच्या वावरात एक थेंब नाही पोहोचला...'' असे जाहिरातील आजोबा शेतकरी सांगताना दिसतात. २०१४ च्या निवडणूक कॅम्पॅनेमध्ये भाजपाने या आजोबांच्या माध्यमातून प्रचार केला होता. आता, त्याच आजोबांच्या माध्यमातून विकासाचा प्रचार केला जातोय. 

''एक काळ होता, जेव्हा घरच्या बायांना पाण्यासाठी मैल नं मैल दूर जावे लागे. गावात विहिरी होत्या, पण घाण पाण्यामुळे रोगराईचं भ्या होतं ना. आता, जलजीवन मिशनमुळे पाणी नळानळातून घराघरात पोहोचत आहे,'' असे ते बाबा सांगताना दिसून येतात. जाहिरातीमधील बाबांचे दोन्ही व्हिडिओ शेअर करत राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाने अजित पवार आणि भाजपावर निशाणा साधला आहे. 

''ज्या अजित पवारांवर ७० हजार कोटींच्या सिंचन घोटाळ्याचे आरोप करून २०१४ च्या निवडणुकीवेळी भाजपने जाहिराती केल्या होत्या, त्याच जाहिरांतीमधील आजोबांना सोबत घेऊन भाजप आता नव्या जाहिरातींव्दारे पक्षाचा प्रचार करत आहे. यंदाच्या जाहिरातीत मात्र भाजपकडून अजित पवारांच्या ७० हजार कोटींच्या सिंचन घोटाळ्यावर मौन बाळगण्यात आलंय. परंतु भाजपकडून पाळण्यात आलेलं हे मौन जनता चांगलं ओळखून आहे'', असे ट्विट राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्यावतीने करण्यात आलं आहे.  

टॅग्स :राष्ट्रवादी काँग्रेसभ्रष्टाचारअजित पवारभाजपा