...अन् त्याच क्षणी केला निर्धार, नातीच्या शिक्षणासाठी घर विकून आजोबा राहतात रिक्षात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 15, 2021 05:30 AM2021-02-15T05:30:28+5:302021-02-15T05:33:02+5:30

The grandfather sells the house for his grandson's education : नातीचे शिक्षणाचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी वर्षभरापूर्वी त्यांनी मुंबईतील त्यांचे घर विकले आणि पत्नी, सून आणि नातवंडांना आपल्या एका नातेवाइकांच्या घरी पाठवून दिले.

The grandfather sells the house for his grandson's education and lives in a rickshaw | ...अन् त्याच क्षणी केला निर्धार, नातीच्या शिक्षणासाठी घर विकून आजोबा राहतात रिक्षात

...अन् त्याच क्षणी केला निर्धार, नातीच्या शिक्षणासाठी घर विकून आजोबा राहतात रिक्षात

Next

मुंबई : तीन मुले, एकाचा मृत्यू, दुसऱ्याने आत्महत्या केली अन् तिसऱ्याची नोकरी गेली, पण अशा परिस्थितीत खचून न जाता, वांद्रे येथे राहणाऱ्या आजोबांनी आपल्या नातीचे शिक्षण पूर्ण करण्याचा निर्धार केला. शिक्षणाच्या खर्चासाठी त्यांनी घर विकले. कुटुंबीयांना गावी पाठविले. नातीचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी, कुटुंबाला हातभार लावण्यासाठी ते रिक्षा चालवत असून, रिक्षाच त्यांचे घर झाले आहे. देसराज जोद सिंग असे या आजोबांचे नाव आहे. ते मूळचे हिमाचल प्रदेशचे आहेत.
देसराज यांचा ४० वर्षांचा एक मुलगा सहा वर्षांपूर्वी बेपत्ता झाला होता. त्यानंतर एक आठवड्यानंतर त्याचा मृतदेह आढळून आला. त्याच्या मृत्यूचे दुःख करण्याइतका वेळही त्यांना मिळाला नाही. कुटुंबाची जबाबदारी त्यांच्या खांद्यावर आल्यामुळे दुसऱ्याच दिवशी रिक्षा घेऊन ते घराबाहेर पडले. त्यानंतर, दोनच वर्षांनी त्यांच्या दुसऱ्या मुलानेही आत्महत्या केली, तर तिसऱ्या मुलाची नोकरी गेल्याने बेरोजगार झाला. मोठा मुलगा अविवाहित होता. दुसऱ्या आणि तिसऱ्या मुलाला प्रत्येकी दोन मुले आहेत. देसराज यांच्यावर आपली पत्नी, सून आणि चार नातवंडांची जबाबदारी हाेती. त्यावेळी नववीत असलेल्या त्यांच्या नातीने शाळा सोडण्याची इच्छा व्यक्त केली, तेव्हा त्यांनी तिला जेवढे शिकायचे तेवढे शिक, असे सांगत दिलासा दिला.
देसराज यांच्या नातीने १२वीला ८० टक्के गुण मिळवल्यावर गिऱ्हाईकांना त्यांनी रिक्षातून मोफत फिरविले होते. त्यांच्या नातीला बी.एड्‌ करून शिक्षक व्हायचे आहे. तिचे हे स्वप्न पूर्ण झाल्यावर पुन्हा एकदा लोकांना रिक्षातून मोफत फिरवणार, असे त्यांनी सांगितले. रिक्षा चालवून महिनाभरात देसराज १० हजार रुपये कमावतात. त्यातील सहा हजार रुपये ते नातवंडांच्या शाळेच्या फीसाठी खर्च करतात, तर उरलेल्या चार हजारांमध्ये सात जणांचे कुटुंब चालवतात.
नातीचे शिक्षणाचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी वर्षभरापूर्वी त्यांनी मुंबईतील त्यांचे घर विकले आणि पत्नी, सून आणि नातवंडांना आपल्या एका नातेवाइकांच्या घरी पाठवून दिले. स्वतः मुंबईतच राहून रिक्षा चालविण्याचे काम सुरूच ठेवले. सकाळी सहा वाजताच ते रिक्षा सुरू करतात आणि रात्री उशिरापर्यंत हे काम करतात. या प्रवासात ते रिक्षातच जेवतात आणि रात्री झोपतातही रिक्षातच. त्यांच्यासाठी रिक्षाच त्यांचे घर बनले आहे.

... त्याच क्षणी मनाशी केला निर्धार
मोठ्या मुलाच्या मृत्यूतून सावरत नव्हतो, तोच एक दिवस दुसरा मुलगा म्हणाला की, मी खूप तणावात आहे. त्याला म्हणालाे, जेवून घे. चिंता सोडून दे, सर्व ठीक होईल. ताे ‘हो’ म्हणाला अन् बाहेर जेवायला जातो, असे सांगून गेला. त्यानंतर, त्याने आत्महत्या केली. ते दुःख पचविणे खूप कठीण होते. मला चक्कर आली, त्यावेळी पोलिसांनी आधार दिला, पण त्या क्षणी निर्धार केला की, आपल्याला काहीही झाले, तरी चालेल, पण कुटुंबाला काही कमी पडू द्यायचे नाही.    - देसराज जोद सिंग

Web Title: The grandfather sells the house for his grandson's education and lives in a rickshaw

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Mumbaiमुंबई