कुटुंबावर दुःखाचा डोंगर! नातीच्या शिक्षणासाठी आजोबांनी विकलं घर; दिवसा रिक्षा चालवायची अन् रात्री...
By प्रविण मरगळे | Published: February 13, 2021 01:44 PM2021-02-13T13:44:15+5:302021-02-13T13:45:58+5:30
Emotional Story of Auto Driver in Mumbai: या रिक्षाचालकाचं नाव आहे देसराज....त्यांच्या दोन्ही मुलांचं निधन झालं आहे, अशातच कुटुंबाचा उदरनिर्वाह करण्यासाठी तसेच नातवडांची शिक्षण पूर्ण करण्याची जबाबदारी आता त्यांच्या वयोवृद्ध खांद्यावर येऊन पडली आहे.
असं म्हटलं जातं की आयुष्यात नेहमी चढ-उतार असतात, कधी सुख तर कधी दुख: येत असतं, परंतु या संघर्षातून पुढे जाऊन खऱ्या अर्थाने काही जण आपलं आयुष्याला प्रेरणा देत असतात. अशीच एक गोष्ट आम्ही तुम्हाला सांगणार आहोत जी तुमच्या डोळ्यात पाणी आणेल. ह्यूमन्स ऑफ बॉम्बे फेसबुक पेजवर ही गोष्ट शेअर केली आहे. ही गोष्ट आहे एका ऑटो रिक्षा चालकाची...
या रिक्षाचालकाचं नाव आहे देसराज....त्यांच्या दोन्ही मुलांचं निधन झालं आहे, अशातच कुटुंबाचा उदरनिर्वाह करण्यासाठी तसेच नातवडांची शिक्षण पूर्ण करण्याची जबाबदारी आता त्यांच्या वयोवृद्ध खांद्यावर येऊन पडली आहे. देसराज म्हणाले की, ६ वर्षापूर्वी माझा सर्वात मोठा मुलगा घरातून अचानक गायब झाला, नेहमीप्रमाणे तो त्याच्या कामासाठी बाहेर पडला होता, तो कधीच परत आला नाही. जवळपास १ आठवड्यानंतर देसराज यांच्या मोठ्या मुलाचा मृतदेह सापडला, घरची जबाबदारी असल्याने मुलाच्या मृत्यूचं दुख: हे त्यांना प्रगट करता आलं नाही.
दुसऱ्याच दिवशी देसराज रिक्षा चालवण्यासाठी निघाले, त्याच्या २ वर्षानंतर छोट्या मुलाने आत्महत्या केली. त्यानंतर देसराज पूर्णपणे कोसळले, पण सून आणि नातवडांच्या चिंतेने त्यांनी स्वत:ला यातून सावरले, सून आणि नातवंडे ही माझी जबाबदारी आहे, ज्यांच्यामुळे मला पुन्हा काम करण्याची ताकद मिळाली, एकदा माझ्या नातीनं मला विचारलं की तिला शिक्षण सोडावं लागेल का? त्यावर मी सांगितले तुला जेवढं शिकायचं तेवढं शिक..त्यावेळी माझी नात नववीमध्ये होती असं देसराज म्हणाले.
कुटुंबाला जास्त पैशांची गरज भासू लागली तेव्हा मी सकाळी ६ वाजल्यापासून ऑटो चालवू लागलो, रात्रीपर्यंत काम केल्यानंतर महिन्याकाठी मला १० हजार कमाई होते, यातील ६ हजार नातवंडांच्या शिक्षणासाठी जातात तर बाकीच्या ४ हजारात घरातील ७ सदस्यांचं उदरनिर्वाह होतो, अनेकदा त्यांच्या कुटुंबाकडे जेवणासाठी काहीच नव्हतं, यात पत्नी आजारी पडली, तिच्या औषधांसाठी देसराजने लोकांकडे मदत मागितली होती, देसराज यांच्या नातीला १२ वीमध्ये ८० टक्के मार्क्स आले होते, त्यादिवशी संपूर्ण दिवस लोकांना रिक्षातून फ्रि प्रवास दिला होता असं देसराज यांनी सांगितले.
त्यानंतर नातीने बीएड पूर्ण केल्यानंतर शिक्षणासाठी दिल्लीत जाण्याचा विचार केला, तेव्हा देसराज यांनी पैसे नसल्याने स्वत:चं घर विकलं, नातीला दिल्लीत पाठवलं, बाकी कुटुंबातील सदस्यांना नातेवाईकांकडे पाठवून स्वत: रिक्षात झोपू लागले, जेवू लागले. सुरुवातीला अनेक अडचणींचा सामना केला परंतु आता त्याची सवय झाली आहे, पण जेव्हा नातीचा फोन येतो आणि क्लासमध्ये पहिली आल्याचं सांगतं तेव्हा सर्व त्रास विसरून मला आनंद होतो.