बारा तासांत चालू लागले आजोबा; खुब्याच्या सांध्याची अवघड शस्त्रक्रिया यशस्वी
By ऑनलाइन लोकमत | Published: January 12, 2023 08:17 AM2023-01-12T08:17:52+5:302023-01-12T08:17:58+5:30
आता आजोबांची प्रकृती स्थिर असून त्यांना पुन्हा पूर्ववत आयुष्य जगता येत आहे.
- स्नेहा मोरे
मुंबई : सांताक्रूझ येथील ६९ वर्षीय सहव्याधीग्रस्त आजोबा खुब्याच्या सांध्याच्या गुंतागुंतीच्या शस्त्रक्रियेनंतर अवघ्या १२ तासांत स्वतःच्या पायावर उभे राहिले. पाच वर्षांपूर्वी जे.जे. रुग्णालयात बायोपोलर हेमीआर्थोप्लास्टी झालेल्या या रुग्णाला पुन्हा पायाच्या उजव्या बाजूला खुब्याच्या ठिकाणी फ्रॅक्चर असल्याचे निदान झाले. जेजे रुग्णालयाच्या डॉक्टरांनी जटिल आणि गुंतागुतींची शस्त्रक्रिया यशस्वीरीत्या पार पाडल्याने आता आजोबांची प्रकृती स्थिर असून त्यांना पुन्हा पूर्ववत आयुष्य जगता येत आहे.
या रुग्णाच्या प्रकरणाविषयी जेजे रुग्णालयाच्या अस्थिव्यंगरोग विभागाचे प्रमुख, सह प्राध्यापक डॉ. नदीर शाह यांनी सांगितले, या रुग्णावर रिव्हिजन हिप रिप्लेसमेंट शस्त्रक्रिया करण्यात आली. प्रत्येक शस्त्रक्रिया ही जशी फायदेशीर आहे, तसे त्यात काहीअंशी धोके असतातच. तंत्रज्ञानातील आधुनिकतेमुळे, आधुनिक उपकरणांमुळे, साधन सामग्रीतील सुसज्ज यंत्रणेमुळे व ही कौशल्ये आत्मसात करणाऱ्या प्रशिक्षित तज्ज्ञांमुळे शस्त्रक्रियेतील अचूकता वाढली आहे, धोकेही कमी झाले आहेत. मात्र, वैद्यकीय इतिहास असणाऱ्या रुग्णांवरही शस्त्रक्रियापूर्व तपासणी व योग्य काळजी घेऊन आता शस्त्रक्रिया यशस्वी होतात.
सहज-सुलभ हालचाली करता येतात, दैनंदिन स्वतःची कामे, प्रवास करता येतो. आयुष्य परावलंबित्व होऊन जगण्यापेक्षा वेदनांपासून मुक्त होऊन जगण्याचा पर्याय केव्हाही चांगला आहे. जेजे रुग्णालयात ११ डिसेंबर रोजी या रुग्णावर शस्त्रक्रिया करण्यात आली, त्यानंतर २६ डिसेंबर रोजी डिस्चार्ज करण्यात आला.
मुंबई : सांताक्रूझ येथील ६९ वर्षीय सहव्याधीग्रस्त आजोबा खुब्याच्या सांध्याच्या गुंतागुंतीच्या शस्त्रक्रियेनंतर अवघ्या १२ तासांत स्वतःच्या पायावर उभे राहिले. pic.twitter.com/3Jms0n3ZEZ
— Lokmat (@lokmat) January 12, 2023
वेदनांपासून मिळाली मुक्ती
रुग्णाला उच्चरक्तदाब, मधुमेहाची समस्या आहे. त्यामुळे अशा रुग्णांना या शस्त्रक्रिया करताना अधिक धोका असतो. मात्र, या रुग्णाने शस्त्रक्रियेनंतर अवघ्या १२ तासांत उभे राहून चालण्याचा प्रयत्न केला, तो यशस्वीही झाला. वय, आजार यानुसार असणारे धोके लक्षात घेऊन योग्य काळजी घेत शस्त्रक्रिया केली. त्यामुळे रुग्णास वेदनांपासून मुक्ती मिळाली.
शस्त्रक्रिया अद्ययावत पद्धतीने
सहा वर्षांपूर्वी झालेल्या शस्त्रक्रियेत सिमेंटचा वापर करण्यात आला होता, यामुळे पाच वर्षांच्या कालावधीपर्यंत हालचाल सामान्य राहते.
मात्र, आता शस्त्रक्रियेची पद्धती अद्ययावत झाली आहेत. नव्याने झालेल्या शस्त्रक्रियेत सिमेंटचा वापर करण्यात आला नाही. मात्र, तरीही वीस वर्षांपर्यंत खुब्याच्या हालचालीस त्रास होत नाही, असे डॉक्टरांनी सांगितले.
खासगीत लाखोंचा खर्च
खासगी रुग्णालयात शस्त्रक्रियेसाठी पाच ते सात लाख रुपयांचा खर्च येतो. मात्र, शासकीय रुग्णालयात अशा स्वरुपाच्या शस्त्रक्रिया शासकीय योजनेंतर्गत मोफत करण्यात येतात, असेही डॉक्टरांनी सांगितले.