सहाय्यक आयुक्तांची पोलिसांत तक्रार, पोलिसांकड़ून केंद्राबाहेरील बंदोबस्तात वाढ
माहीमच्या लसीकरण केंद्रावर राजकीय मंडळीची दादागिरी
सहायक आयुक्तांची तक्रार : पोलिसांकड़ून केंद्राबाहेरील बंदोबस्तात वाढ
लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : लसीकरण केंद्रावरील गर्दीवर नियंत्रण आणण्याचे आव्हान यंत्रणांवर असताना, दुसरीकडे काही राजकीय मंडळी आणि स्वयंघोषित कार्यकर्ते आपल्या ओळखीच्या व्यक्तींना आधी सोडण्यासाठी केंद्रातील डॉक्टरांशी हुज्जत घालत असल्याचा धक्कादायक प्रकार माहीमच्या लसीकरण केंद्रात होत आहे. या प्रकरणाच्या वाढत्या तक्रारीनंतर सहायक आयुक्त किरण दिघावकर यांनी पोलिसांत तक्रार दिली. त्यानुसार पोलिसांनी केंद्राबाहेर बंदोबस्त वाढवला आहे.
पालिकेमार्फत माहीम प्रसूतिगृह येथे लसीकरण केंद्र सुरू केले आहे. या परिसरात हे एकमेव केंद्र असल्यामुळे या केंद्रात मोठ्या प्रमाणावर गर्दी होत आहे. काही स्वयंघोषित कार्यकर्ते केंद्रावर विनाकारण गर्दी करून तेथील डॉक्टरांशी हुज्जत घालून, त्यांच्यासोबत असलेल्या व्यक्तींना आत सोडण्यासाठी दबाव आणत असल्याच्या तक्रारी जी उत्तर विभागाच्या सहायक आयुक्तांकडे करण्यात आली. त्यानुसार सहायक आयुक्तांनी सहा जणांच्या नावांचा उल्लेख करत ही मंडळी केंद्रावर गोंधळ घालून धमकावत असल्याबाबतची लेखी तक्रार माहीम पोलिसांना दिली आहे. यात राजकीय मंडळीचा समावेश आहे. तसेच संबंधितांना समज देत केंद्राबाहेर बंदोबस्त देण्याची विनंतीही त्यांनी मंगळवारी केली.
माहीम पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक विलास शिंदे यांच्याकडे विचारणा केली असता, याबाबत गुन्हा दाखल केला नसून पोलिसांनी केंद्राबाहेर बंदोबस्त वाढविल्याचे त्यांनी सांगितले. तसेच सहायक आयुक्तांनी तक्रारीत नमूद केलेल्या व्यक्ती बंदोबस्तानंतर त्याठिकाणी पुन्हा फिरकल्या नसल्याचेही त्यांनी नमूद केले.
* लस घेण्यासाठी पैशांची मागणी
काही व्यक्ती बाहेरील व्यक्तींकडे लस घेण्यासाठी पैसे मागत असल्याच्या तक्रारीही प्राप्त होत असून, त्याबाबतही पाेलिसांकडून अधिक चौकशी करण्यात येत असल्याचे समजते.
....................
....